देगलूर : मनसे प्रमुख राज ठाकरे हे भाजपची सुपारी घेऊन काम करीत आहेत़ यामुळे संवेदनशील विषय विनाकारण उकरुन काढून राज्यातील वातावरण दुषित करीत आहेत, असा घणाघाती आरोप नांदेडचे शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख आनंद जाधव यांनी केला़
देगलूर येथील नगरेश्वर मंदिरात जागर जनतेचा पोरखेळ भाजपच्या नेतृत्वाचा या अभियान सभेत ते बोलत होते़ यावेळी जिल्हा प्रमुख उमेश मुंडे, प्रमुख वक्ता डॉ शोभाताई बेंजरगे यांच्यासह पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थितीत होते़
यावेळी पुढे बोलताना जाधव म्हणाले की, नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीत गद्दाराला धडा शिकवला, राज्यात महाविकास आघाडीचे सरकार उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झाल्यानंतर संकटाची मालिका चालू असताना सुद्धा न डगमगता खंबीर पुणे तोंड देत यशस्वीरित्या जबाबदारी पार पाडली़ देशात नंबर १ मुख्यमंत्री म्हणून नावलौकिक मिळवला आहे, त्यामुळे विरोधकांच्या पोटात पोटशूळ उठले आहे़
याच कारणामुळे शिवसेना व सरकारला बदनाम करण्याचा विडा भाजपने मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे, नारायण राणे व त्यांच्या दिवटे चिरंजीव, कंगणा, राणा दांपत्यांनी उचलला आहे़ यासाठी भाजपने या सर्वांना सुपारी दिली आहे, असा आरोप केला़ तर माजी मुख्यमंत्री फडणवीस यांचे मुख्यमंत्री पद गेल्याने पोटात दुखत आहे़ मुख्यमंत्री असताना ऐशोआराम केलेल्या अमृता तोंडून विष निघत असून खोट बोल रेटून बोलं पण अशा पद्धतीने बेछुटपणे बोलत सुटले आहेत़
अभिमन्यूला घेरल्यासारखे विरोधक मुख्यमंत्री यांना घेरले आहेत या सवार्ना शिवसेना पुरुन उरेल,असा विश्वास व्यक्त करीत शिवसैनिकांनी उतु नका मातु नका, जनसेवेचा घेतलेला वसा टाकू नका़ गटबाजी चव्हाट्यावर आणू नका असा सल्ला दिला़ संभाजीनगर येथील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दि. ८ जुन रोजीच्या सभेत विरोधकांना सडेतोड उत्तर देणार आहेत
त्यामुळे सभा यशस्वी करण्यासाठी सवार्नी मोठ्या संख्येने उपस्थितीत रहावे असे आवाहन जाधव यांनी केले़ या सभेत अखिल भारतीय मराठा महासंघाचे राज्य उपाध्यक्ष भाजपचे तालुका उपाध्यक्ष जयदिप वरखिंडे, कॉग्रेसचे पदाधिकारी देविदास जाधव यांनी शिवसेनेत प्रवेश केला़