सोलापूर : म्हैसाळ (ता. मिरज) येथील हत्याकांडप्रकरणी सोलापुरात मांत्रिकाला अटक करण्यात आल्यानंतर त्यांचे कुटुंबीय गायब झाले आहे. मात्र, तो राहत असलेल्या सरवदे नगरात नवीन रहिवासी आहे. तो सोलापुरात भाजीपाला अन्चिंचेचा व्यापार करीत होता, अशी माहिती समजते.
हा प्रकार गुप्तधनाच्या प्रकरणातून झाल्याचे लक्षात आल्यानंतर तेथील एका सीसीटीव्ही कॅमे-यामध्ये घटनेच्या आदल्या दिवशी कार आली होती कारवरून आब्बास महमेदअली बागवान (वय ४८, रा. सरवदे नगर, मुळेगाव रोड), धीरज चंद्रकांत सुरवसे (३०, रा. वसंत विहार ध्यानेश्वरी नगर, जुना पूना नाका (सोलापूर) या दोघांची नावे पुढे आली.
दोघांना सांगली पोलिसांनी रविवारी सोलापुरातून अटक केली आहे. आब्बास बागवान हा लोकांना भाजीपाला अन्चिंचेचा व्यापार करीत असल्याचे सांगत होता. सध्या तो सरवदे नगरात राहत असून, तो त्या भागात नवीन रहिवासी आहे. आजूबाजूच्या लोकांना तो नेमकं काय करतो याची माहिती नाही. मात्र, सांगली पोलिसांनी त्याला अटक केल्यानंतर घरातील कुटुंबीय कुलूप लावून गायब झाले आहेत.
धीरज सुरवसे हा ध्यानेश्वरी नगरात राहत असून, त्यालाही पोलिसांनी अटक केली, तो आब्बास बागवान याच्या सोबत जाताना कार चालवत होता, तो आब्बास बागवान याचा चालक आहे, की साथीदार याबाबत साशंकता आहे. तोही नेमके काय करत होता, याची माहिती आजूबाजूच्या लोकांना नाही.
आब्बास बागवान याच्यावर सोलापुरातील जेलरोड पोलीस ठाण्यात २००८ मध्ये गुन्हा दाखल झाला होता. तुमच्या शेतामध्ये सोन्याचा हांडा आहे. तो काढून देतो असे आमिष दाखवून एका कुटुंबातील पत्नीला आत्महत्या करण्यास त्याने भाग पाडले होते, तर तिच्या पतीला विष पिण्यास भाग पाडले होते, असा आरोप करण्यात आला होता. नऊ वर्षे हा खटला चालल्यानंतर त्याची २०१७ मध्ये निर्दोष मुक्तता करण्यात आली होती.