नांदेड : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या उन्हाळी २०२० पदवी, पदव्युत्तर व व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या परीक्षेचे नियोजन यशस्वी करण्यात येत आहे. त्यामुळे जास्तीत जास्त परीक्षांचे निकाल ३१ ऑक्टोबर पर्यंत जाहीर होणार आहेत. अशी माहिती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांनी दिली. नवीन तंत्रज्ञान, नवीन परीक्षा पद्धती आणि कमी वेळ या सर्वांची सांगड घालतांना एक दोन दिवसाची तांत्रिक अडचण सोडल्यास बाकी परीक्षेचे नियोजन सुरळीत चालू आहे. इतर विद्यापीठाच्या तुलनेत स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ सरस आहे. असे म्हणाल्यास वावगे ठरणार नाही.
उन्हाळी २०२० परीक्षेचे नियोजन करतांना सर्वप्रथम दोन टप्पे आखण्यात आले. पहिल्या टप्प्यात अंतीम सत्राच्या आणि अंतीम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे मागील वषार्चे अथवा सत्राचे बॅकलॉग विषयाची परीक्षा ७ ते १४ ऑक्टोबर दरम्यान घेण्यात आली. दुस-्या टप्यात अंतीम सत्राच्या आणि वर्षाच्या परीक्षा १५ ते ३० ऑक्टोबर दरम्यान घेण्याचे नियोजन करण्यात आले.
नियोजनासाठी सर्वप्रथम परीक्षा मंडळ, विद्याशाखा, आणि मा. व्यवस्थापन परिषद सदस्य यांच्यासोबत बैठकी घेण्यात आल्या. यामध्ये झालेल्या निर्णयानुसार उन्हाळी २०२० परीक्षा एमसिक्यू पद्धतीने ऑनलाईन व ऑफलाईन घेण्याचे ठरले. विद्यार्थांमध्ये ऑनलाईन परीक्षेच्या संदर्भात संभ्रमता राहू नये म्हणून त्यांच्या मॉकटेस्ट घेण्यात आल्या यामध्ये नेमकी परीक्षा कशी घ्यावयाची आहे. याचे प्रशिक्षण देण्यात आले आणि त्याचबरोबर विद्यार्थ्यांना ऑनलाईन किंवा ऑफलाईन जी पद्धती योग्य वाटते त्याची समंतीपत्रक विद्यार्थांकडून भरून घेण्यात आले. २५ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर दरम्यान ऑनलाईन परीक्षेबाबत विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. जवळपास २२ हजार विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पद्धत निवडली तर त्यामधील १६७०० विद्यार्थ्यांनी प्रशिक्षण घेतले. हे सर्व प्रशिक्षण विद्यार्थ्यांना त्यांच्या महाविद्यालयीन स्तरावर को-ओडीर्नेटर द्वारे देण्यात आले.
परीक्षा सुरु झाल्यानंतर मा. व्यवस्थापन परिषदेचे सदस्य आणि परीक्षा मंडळाचे सदस्य यांनी वेळोवेळी महाविद्यालयांना भेटी दिल्या दरम्यान त्यांनी ऑफलाईन परीक्षेसाठी महाविद्यालाच्या तयारीचेही निरीक्षण केले. १५ ऑक्टोबर रोजी पहिला दिवस असल्याकारणाने आणि तसेच काही तांत्रिक अडचण असल्याने या दिवसाची परीक्षा एक ते दोन तास उशिरा सुरु झाली होती. १६ ऑक्टोबर रोजी काही परीक्षा केंद्रावर तांत्रिक अडचणीमुळे वेळेवर प्रश्नपत्रिका पोहचली नाही. त्यामुळे त्या दिवसाचा पेपर रद्द करण्यात आला होता. सदर पेपर १७ ऑक्टोबर रोजी घेण्यात आला. आणि १७ ऑक्टोबर चा पूर्वनियोजित सर्व पेपर हे २८ ऑक्टोबर रोजी घेण्यात आले. असे सुरुवातीच्या दोन दिवसातील अडचणी सोडल्यास बाकी परीक्षा सुरळीत चालू आहेत.
पदवी प्रमाणपत्र अथवा गुणपत्रिका वेगळी अशी काही राहणार नाही किंवा त्यावर कोव्हीड-१९ च्या पार्श्वभूमीचा संबंध राहणार नाही. विद्यापीठाच्या उन्हाळी २०२० परीक्षेदरम्यान ज्या विद्यार्थ्यांच्या (ठएळ,रएळ व उएळ) इतर परीक्षा आल्या. त्या विद्यार्थ्यांसाठी नोव्हेंबर महिन्यात पहिल्या आठवड्यात परीक्षा घेण्यात येणार आहेत. शिवाय पदवी, पदव्युत्तर, व व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या १५ ते ३० ऑक्टोबर दरम्यान परीक्षा ऑनलाईन किंवा ऑफलाईन परीक्षेच्या तांत्रिक अडचणीमुळे जर काही विद्यार्थी परीक्षा देण्यापासून वंचित राहिले असतील तर अशा विद्यार्थ्यांची अतिरिक्त परीक्षा नोव्हेंबरमध्ये घेण्यात येईल. सध्या परीक्षा सुरळीतपणे चालू असल्यामुळे त्या ३० ऑक्टोबर पर्यंत पूर्ण होतील. त्यामुळे विद्यापीठ प्रशासन ३१ ऑक्टोबर रोजी या जास्तीत जास्त परीक्षांचे निकाल घोषित करेल अशी अपेक्षा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांनी व्यक्त केली.
यावेळी पत्रकार परिषदेस कुलगुरू डॉ.उद्धव भोसले, प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. एल. एम. वाघमारे, अंतरविद्याशाखीय अभ्यास अधिष्ठाता डॉ. वैजयंता एन. पाटील, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. रवी एन. सरोदे आणि जनसंपर्क अधिकारी डॉ. अशोक कदम यांची उपस्थिती होती.
माजी सैनिकांसाठी ‘बाळासाहेब ठाकरे सन्मान योजना’ !