नांदेड : अनेक गंभीर गुन्ह्यात पोलीसांना हवा असलेला आरोपी हरविंदरसिंग उर्फ रिंदा याच्या दोन साथीदारांना स्थानिक गुन्हा शाखेने तीन वर्षापुर्वी व्यापा-यावर झालेल्या गोळीबार प्रकरणात पंजाब येथून ताब्यात घेऊन न्यायालयात हजर केले. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी मुद्दसर नदिम यांनी या दोघांना २६ मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
शहरातील बाफना टी पॉईंटजवळ घर असलेल्या इंद्रजितपालसिंग प्रितमसिंग भाटीया यांच्यावर दि. ९ फेबु्रवारी २०१९ रोजी सायंकाळी ६ वाजता गोळीबार झाला. सुदैवाने गोळी जमीनीवर लागल्याने भाटीयांना इजा झाली नाही. हा प्रकार घडला तेंव्हा त्यांच्याकडून खंडणीची मागणी झाली होती. ही खंडणी रिंदाने मागितली आहे असे सांगितले होते. या प्रकरणी इतवारा पोलिस ठाण्यात गुन्हा कलम ३०७ सह इतर कलमान्वये दाखल झाला. या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हा शाखेकडे वर्ग करण्यात आला होता. याप्रकरणात स्थानिक गुन्हा शाखेने आजच्या अगोदर तीन जणांना अटक केली होती. सध्या ते तिघे जामिनावर आहेत.
नांदेडच्या स्थानिक गुन्हा शाखेचे पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांना तपासात या गोळीबारात पंजाबमधील राजबिर नागरा आणि धर्मप्रित सहोता यांचा हात होता ही माहिती मिळाल्यानंतर पोलीस उपमहानिरिक्षक निसार तांबोळी, पोलिस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांच्या मार्गदर्शनात पोलिसांची एक टिम पंजाबला पाठविली. न्यायालयीन प्रक्रिया पुर्ण करून या गुन्ह्याचे तपासअंमलदार सहाय्यक पोलीस निरिक्षक पांडूरंग माने यांनी पंजाब येथून या दोघांना नांदेडला आणले. दि.२३ मे रोजी या दोघांना नांदेडच्या न्यायालयात अंत्यत बंदोबस्तात न्यायालयात हजर केले.
सपोनि पांडूरंग माने यांनी सादरीकरण केल्याप्रमाणे या आरोपींनी त्या दिवशी वापरलेला चाकू जप्त करणे, व्हॉटऍप चॅटची सविस्तर माहिती घेणे आहे यासाठी पोलीस कोठडी द्यावी अशी विनंती केली. हा युक्तीवाद ऐकून न्यायाधीश मुद्दसर नदिम यांनी राजबिरसिंग आणि धरमप्रित या दोघांना दि. २६ मेपर्यंत पोलिस कोठडीत पाठविले आहे. कोठडीच्या तपासा दरम्यान नवी माहिती येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.