हदगाव : पाणी देण्याच्या काळात महावितरण विज बिलाच्या वसुलीसाठी कृषी पंपांचा वीजपुरवठा खंडित करीत आहे. कोणतेही बिल न देता व नोटीस न देता वीज पुरवठा खंडित करणे बेदायदेशीर असून कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांचा वीज पुरवठा खंडित करू नये. अशी ताकीद शेतकरी संघटनेने महावितरणच्या हदगांव कार्यालयात निवेदनाद्वारे दिली आहे.
सद्या उन्हाळ्याला सुरुवात झालेली असून पिकांना नियमितपणे पाणीपुरवठा करावा लागत आहे. त्यातही महावितरण कडून शेतकऱ्यांसाठी फक्त आठच तास वीज पुरवठा केला जात आहे. दिवसा वीज पुरवठा नसल्यामुळे रात्री सुद्धा शेतकऱ्यांना पिकांना पाणी देण्यासाठी जावे लागत आहे. शेतकऱ्यांना दिवसा किमान आठ तास वीज पुरवठा करावा अशी मागणी अनेक वर्षांपासून शेतकरी करीत आहेत. परंतु आळीपाळीने दिवसा व रात्री वीज पुरवठा केला जात आहे. त्यातच अनेक वेळा वीज खंडित होण्याचे प्रकार घडत असतात. एवढेच नव्हे तर अनेक ठिकाणी तर अत्यंत कमी दाबाने वीज पुरवठा केला जातो.
त्यामुळे शेतकऱ्यांच्या विजपंपाच्या मोटारी जळण्याचे प्रमाण वाढले आहे. याबाबतीत शेतकरी संघटना व स्वाभिमानी शेतकरी संघटनेने वेळोवेळी महावितरणला धारेवर धरले. तसेच ऊर्जामंत्री आणि मुख्यमंत्र्यांना सुद्धा अनेक वेळा निवेदने देऊन शेतीला अखंडित आणि पूर्ण दाबाने वीज पुरवठा करावा अशी मागणी केलेली आहे. परंतु वीजपुरवठ्याच्या बाबतीत कोणताही फरक पडला नसून अशाही ही परिस्थितीत मात्र वीज वसुली जोमात सुरू आहे. या वर्षी सुरुवातीला दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या कृषी पंपांचा वीज पुरवठा खंडित करून विज बिल वसुलीचे सत्र सुरू केले होते.
दरम्यान राजकीय पुढारी नेते आणि शेतकरी संघटनांच्या दबावामुळे एवढे दिवस सक्तीची वसुली थांबवण्यात आली होती. परंतु आता मोठ्या प्रमाणात गावोगावी फिरून व वीज पुरवठा खंडित करून वसुली करण्यास सुरुवात झाली आहे. याबाबत अनेक शेतकऱ्यांच्या तक्रारी आल्यावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष प्रल्हाद पाटील सूर्यवंशी, शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष पंजाबराव देशमुख, युवा आघाडीचे विलास महाजन यांनी पुढाकार घेत शासनाला उपविभागीय अधिकारी कार्यालयात निवेदन सादर करून महावितरणला वीजबिल वसुलीसाठी वीजपुरवठा खंडित न करण्याबाबत ताकीद दिली.
तसेच वीज वसुलीसाठी वीजपुरवठा खंडित केला तर मोठ्या प्रमाणात आंदोलन उभे केले जाईल असा इशारा सुद्धा दिला. त्यामुळे हदगाव तालुक्यात महावितरणने थोडी नमती भूमिका घेत वीज पुरवठा खंडित करण्याचे प्रकार थांबवले आहेत. मात्र शेतकऱ्याकडून विजबिलाची वसुली करण्याचा तगादा सुरूच आहे. यासाठी कालच स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने हदगांवचे तहसीलदार मार्फत शासनाला निवेदन देऊन वीज पुरवठा सुरळीत करावा व वसुलीसाठी विजपुरवठा खंडित करू नये यासाठी निवेदन दिले आहे. बाजूच्या तेलंगणा राज्यात मात्र शेतीला २४ तास आणि संपूर्ण मोफत वीज पुरवठा केला जातो. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांतून सरकार विषयी संताप व्यक्त केला जात आहे.