24.6 C
Latur
Sunday, October 24, 2021
Homeनांदेडभोकरच्या कोरोना सेंटरमध्ये तपासणी किटचा तुटवडा

भोकरच्या कोरोना सेंटरमध्ये तपासणी किटचा तुटवडा

एकमत ऑनलाईन

भोकर : तालुक्यात एकमेव असलेल्या कोरोना केअर सेंटरमधील कोरोना तपासणीसाठी असलेल्या अँटीजन व आरटीपीसीआर चाचण्यांचे किट संपल्यामुळे कोरोना संशयित रुग्णांना चाचणी न करताच माघारी घरी परतावे लागत असल्याने नागरिकांत भितीचे वातावरण पसरले आहे. कोरोनाच्या आलेल्या दुस-या लाटेमुळे राज्य पुन्हा संपूर्ण लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर असून प्रचंड वेगाने वाढणा-या रूग्णसंख्येमुळे संसर्गाच्या दृष्टीने नांदेड जिल्हा देशात टॉप टेन जिल्हा म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. भोकर तालुक्यातही दिवसेंदिवस कोरोनाचे संकट गडद होत असून शहरासह ग्रामीण भागातही कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी चाचण्यांची संख्या वाढवणे आणि विलगी करणासह त्वरीत इतर उपचार करणे आवश्यक असल्याने राज्य शासनाने चाचण्यांची संख्या वाढवण्यावर भर दिला आहे.

लॉकडाउनच्या भितीने जिवनावश्यक वस्तूंबरोबरच इतरही वस्तूंची खरेदी विक्री जोमात नागरीक करीत असल्याने विक्रेते, ग्राहक पुरवठा करणारा व्यापारी वर्ग आणि कांही रिकामटेकड्यांच्या गदीर्ने बाजारपेठ फुलून जात आहे. परिणामी कोरोना रूग्णांच्या संख्येत दररोज नव्याने भर पडत आहे. कोरोना चाचणीसाठी दररोज सेंटरवर मोठी गर्दी होत असून त्यासाठी आवश्यक असणा-या अँटीजन आणि आरटीपीसीआर चाचणीच्या किटचा पुरवठा अचानक संपल्याने भोकरकरांची चिंता वाढली आहे.

दिवसेंदिवस तालुक्यातील वाढती कोरोना रुग्णसंख्या लक्षात घेऊन येथील आरोग्य,महसूल, पोलीस,व स्थानिक स्वराज्य संस्थाचे अधिकारी कर्मचारी तसेच खाजगी डॉक्टर आणि शिक्षक हे कोरोना विरुद्ध लढण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करित असल्याचे दिसून येत आहेत.भोकर उपविभाचे कर्तव्यदक्ष अधिकारी राजेंद्र खंदारे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार भरत सूर्यवंशी यांनी कोरोना विषयक जनजागृती करिता शहरात ७ पथकांची स्थापना केली असून यांमध्ये आरोग्य, महसूल, पोलीस, स्थानिक स्वराज्य संस्था, खाजगी डॉक्टर, शिक्षक आदींचा समावेश आहे. सदरील पथकांमार्फत कोरोना तसेच लसीकरणा संबंधी जनजागृती करून गृहभेटीदरम्यान कुटुंबातील संशयित रुग्णांच्या तपासणीसाठी समुपदेशन केले जात आहे.

त्यामुळे शहर व तालुक्यातील तसेच शेजारील तालुक्यातील कोरोनाची लक्षणे असणा-या संशयित रुग्णांची कोविड केअर सेंटरवर रुग्णांसह नातेवाईकांचीही दररोजच तपासणीसाठी मोठी गर्दी पहावयास मिळत आहे. येथे होणा-या चाचण्यातून कोरोना लागण झालेल्या रुग्णांवर औषधोपचार केले जात असल्यामुळे संसर्ग होण्यापासून इतरांना दूर ठेवण्यास मोठी मदत होते. परंतू अशी गंभीर परिस्थिती असूनही येथे कोविड-१९ चाचणीसाठी आवश्यक असणा-या चाचणी किट उपलब्ध होत नसल्याने मोठा अनर्थ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तेव्हा तपासणी किट्स लवकरात लवकर उपलब्ध करून देण्यात याव्यात अशी मागणी नागरीक करीत आहेत.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या