धर्माबाद : देवगिरी एक्सप्रेसच्या एसी कोचमधून अचानक धुराचे लोट निघाल्याची गंभीर घटना धर्माबाद रेल्वेस्थानकावर सोमवारी सकाळी १०.३० वाजता घडली. यामुळे प्रवाशांची चांगलीच धावपळ उडाली.
नेहमी प्रमाणे मुंबई येथुन निजामबादकडे निघालेली देवगिरी एक्स्प्रेस सोमवारी सकाळी १०.३० च्या सुमारास धर्माबाद रेल्वे स्थानकाजवळ येताच चालकाने बे्रक लावले. परंतू बे्रक जोरात दाबल्या गेल्याने एका एसी कोचमधून धुराचे लोट सुरू झाले. यामुळे कोचमधील आणि स्थानकावरील प्रवाशांची एकच धावपळ उडाली. सदर घटना पाहताच रेल्वे तातडीने स्थानकावर थांबवुन कोचची तपासणी करण्यात आली. तेव्हा चालकाने ब्रेक अचानक जोरात दाबल्याने कोचखालून धुर निघाला असे कारण रेल्वेच्या वरिष्ठ अधिका-याने सांगून सदर प्रकरणाची चौकशी करण्यात येईल असे स्पष्ट केले.
या घटनेमुळे देवगिरी एक्सप्रेस थोडा वेळ स्थानकावर थांबवून पुन्हा सोडण्यात आली. दरम्यान या रेल्वेचे नविन कोच असताना सुद्धा सदर प्रकार घडला आहे, यामुळे प्रवासी सुरक्षित आहेत का असा सवाल उपस्थित होत असून रेल्वे प्रशासनाचा भोंगळ कारभार यानिमित्ताने चव्हाटयावर आला आहे. ची खंत माजी उपनगराध्यक्ष रमेशचंद्र तिवारी यांनी व्यक्त केली.