अर्धापूर : तालुक्यातील स्मार्ट व्हिलेज लहान येथील बोधीसत्व बुध्दविहारात तथागत भगवान गौतम बुद्धाच्या मुर्तीची प्रतिष्ठापना दि. १६ मे रोजी बुध्द पौर्णिमा व बुध्दजयंतीचे औचित्य साधून करण्यात आली. यानिमित्त संपूर्ण गावातून काढण्यात आलेल्या बुध्दमुर्ती मिरवणुकीचे मुस्लिम समाजाच्या युवकांकडून उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. तर ही मिरवणूक मुस्लिम वस्तीत येताच मुस्लिम महिलांनी स्वयंस्फूर्तीने छतावर जावून गौतम बुध्दाच्या मुर्तीवर फुलाचा वर्षाव केला. या कार्यक्रमातून लहान येथील मुस्लिम बंधू – भगिनींनी मुस्लिम – दलीत – हिंदू ऐक्याचे दर्शन घडविले आहे.
अर्धापूर तालुक्यातील लहान हे अंदाजे साडेपाच ते सहा हजार लोकवस्तीचे गाव आहे. येथे ंिहदू, मुस्लिम, बौद्ध, दलीत यासह सर्व जाती – धर्माचे लोक गुण्यागोंिवदाने नांदत आहेत. हिंदू बांधवाकडून काढण्यात शिवजयंती मिरवणुकीत येथील मुस्लिम युवक सहभागी होवून एकत्र नाचतात. इतकेच नाही तर या मिरवणुकीत सहभागी झालेल्या सर्व हिंदू बांधवांना फराळ आणि शितपेय पाजून त्यांचे आदरातिथ्य करतात. तसेच रमजान ईदनिमित ंिहदू व दलीत बांधवांना एकत्र करून मशिदीमध्ये नेवून त्यांना शिरखुर्ममा पाजून त्यांचे स्वागत केले जाते. अशा प्रकारे हिंदु आणि मुसलमान समाजातील तरूण युवक एकमेकांच्या सुखादु:खात सहभागी होऊन गुण्यागोविंदाने एकत्र नांदत आहेत.