नांदेड : शुक्रवार, दि. 2 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता महात्मा गांधी पुतळा वजिराबाद येथे शेतकरी संघटनेच्या वतीने राज्यव्यापी समर्थन व संपूर्ण स्वातंत्र्य आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती नांदेड जिल्हा शेतकरी संघटना नेते शिवाजीराव शिंदे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
केंद्र शासनाने संसदेत संमत केलेल्या कृषी विधेयकांना शेतकरी संघटनेने पाठिंबा दिला आहे. शेतकरी संटघनेच्या अनेक वर्षांच्या मागणीनुसार शेतकऱ्यांसाठी बाजारपेठ खुली होत आहे हे शेतकऱ्यांच्या हिताचे आहे. शेतकऱ्यांना शेतीमाल व्यापाराचे स्वातंत्र्य सरकार देत आहे, मात्र आवश्यक वस्तू कायद्यातून वगळलेल्या वस्तू, भाववाढ झाल्यास पुन्हा आवश्यक वस्तू कायद्याच्या कक्षेत घेण्याच्या विधेयकातील तरतुदीला शेतकरी संघटनेचा विरोध आहे. या तरतुदीमुळे शेतीमाल व्यापारावर अनिश्चिततेची टांगती तलवार राहणार आहे. या तरतुदीमुळे शेतकरी, व्यापारी, प्रक्रिया उद्योजक, निर्यातदार व गुंतवणूकदार सर्वांचाच तोटा आहे. कायदा तयार करताना सरकारने ही दुरूस्ती करावी, अशी शेतकरी संघटनेची मागणी आहे.
सरकार योग्य दिशेने वाटचाल करीत आहे, याचे समर्थन करतानाच शेतकऱ्यांना अर्धवट नको, संपूर्ण स्वातंत्र्य पाहिजे यासाठी शेतकरी संघटना आग्रही आहे. सरकारचे लक्ष या मागणीकडे वेधण्यासाठी व विधेयकांविषयी चिंतन करण्यासाठी 2 आक्टोबर रोजी महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीच्या दिवशी शेतकरी त्यांच्या पुतळासमोर सकाळी 11 ते 3 वाजेपर्यंत चिंतन प्रबोधन करणार असून त्यानंतर मोर्चाने जाऊन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात येणार असल्याची माहिती शेतकरी संघटना नेते गुणवंत पाटील हंगरगेकर, जिल्हाध्यक्ष शिवाजीराव शिंदे, ऍड. धोंडिबा पवार यांनी दिली.
अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी राजेंद्र मिरगणे थेट शेतकऱ्याच्या बांधावर