नांदेड : लांबलेल्या पावसामुळे सर्वांचे डोळे आकाशाकडे लागलेले असतांनाच गुरूवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास नांदेडशहरासह जिल्ह्यात वादळी पावसाने सलामी दिली़ पहाटे चारपर्यंत हा पाऊस सुरूच होता़ मुखेडमध्ये जोरदार तर उर्वरित तालुक्यात हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला़ तर बुधवारी सायंकाळी याच वादळी पावसाने धर्माबादला जोरदार तडाखा दिला़ अनेक विद्युत खांबे आडवी झाली़ झाडे उन्मळून पडली तर अनेकांच्या घरावरील पत्रे उडून गेली़ यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे़
यंदा आठवडाभरापुर्वीच पावसाचे आगमन होईल असे भाकित हवामान खात्याने वर्तविले होते़ मात्र चक्रीवादळ आणि हवामानातील बदल, यामुळे पाऊस लांबला होता़ दि़ ७ जून रोजी मृग नक्षत्राचा मुहूर्त ही चुकला़ यामुळे सर्वांचे डोळे आकाशाकडे लागलेले असताना बुधवारी काही जिल्हे वगळता महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यात मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली होती़ नांदेड जिल्ह्यात गुरूवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास मेघगर्जना होऊन वादळी वा-यासह पाऊस सुरू झाला़ नांदेड शहरासह जिल्ह्यातील अनेक भागात पहाटे चार वाजेपर्यंत हा पाऊस सुरू होता़ शहरातील नव्या पुलावरील रस्त्यासह विविध भागातील रस्त्यावर पाणी साचले होते़ तर विज पुरवठा खंडीत झाल्याने नागरिकांना रात्र अंधारात काढावी लागली.
तर बुधवारी सायंकाळीच्या सुमारास धर्माबाद तालुक्यात जोरदार वादळी पाऊस झाला़ यात कुंडलवाडी ते धमार्बाद विजेचा पुरवठा करणारी लाईन बाबळी येथील हनुमान, वाडीच्या मारुतीपासून धमार्बादपर्यंत विजेचे वीस खांब आडवे झाले़ यामुळे वीज पुरवठा खंडित झाला़ यासह अनेक गावातील जुने वृक्ष वादळाने उन्मळून पडली़ बाबळी बंधारा फाट्यावरील इसार पंपा समोरील एक धाबा व विद्युत खांब पत्रासहित उडून गेला. बाबळी येथील ब-याच घरावरील टीन पत्रे गावाबाहेर पाचशे मीटरपर्यंत उडून गेली. अर्ध्या तासाच्या पावसाने पावसाने हाहाकार उडून दिल्याने जगजीवन विस्कळीत झाले़ या वादळी पावसाने फळ पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.