नांदेड : पोलिस मुख्यालयामध्ये कार्यरत एका पोलिस उपनिरीक्षकांने थेट गोदावरी नदीपात्रात उडी मारुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना गुरुवारी सकाळी ११ च्या सुमारास गोवर्धनघाट पुलावर घडली़ या घटनेमुळे पोलिस दलात खळबळ उडाली आहे. सध्या उपनिरीक्षकास उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, पोलिस उपनिरीक्षक असलेले शेषेराव राठोड सध्या पोलिस मुख्यालयात कार्यरत आहेत़ गुरूवारी राठोड यांनी सकाळी ११ च्या सुमारास गोवर्धनघाट पूल गाठला़ काहीवेळ इकडे तिकडे पाहून थेट गोदावरी नदीपात्रात उडी घेतली़ यावेळी गोदावरी पात्राजवळ असलेल्या नागरीकांनी त्यांना तातडीने पाण्याबाहेर काढले़ घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक भंडरवार यांच्यासह कर्मचा-यांनी घटनास्थळी भेट दिली.
आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणारे पोलिस उपनिरीक्षक राठोड हे गंभीर जखमी झाले असून सध्या त्यांच्यावर विष्णुपूरी येथील शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत. राठोड यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न कोणत्या कारणामुळे केला हे अद्याप स्पष्ट झाले नाही. मात्र शहरामध्ये उलट सुलट चर्चेला उधान आले होते. दरम्यान पोलिस निरीक्षक भंडरवार यांनी, सदर कर्मचारी हा काही दिवसापुर्वी आजारी होता़, या आजारास कंटाळून त्यांनी हे टोकाचे पाऊस उचलले असावे असा अंदाज व्यक्त केला. याप्रकरणी वजीराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.