किनवट (प्रतिनिधी) : ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी महाराष्ट्र सरकारने मध्यप्रदेश सरकारच्या धर्तीवर ट्रीपल टेस्ट आणि इम्पिरीकल डाटा तयार करुन सुप्रीम कोर्टात तात्काळ दाखल करावा. ही ज्वलंत व ओबीसींच्या अस्मितेची मागणी घेऊन ओबीसी मोर्चा २३ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवस्यीय लाक्षणिक उपोषण करणार आहे.
खा.प्रतापराव पाटील चिखलीकर, जिल्हाध्यक्ष प्रविण साले, व्यंकटराव पाटील गोजेगांवकर व ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष व्यंकटेश ज्ािंदम यांच्या उपस्थितीत आंदोलन पार पडणार आहे. जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन भाजप ओबीसी आघाडी जिल्हाध्यक्ष बाबूराव केंद्रे यांनी केले आहे.
महाराष्ट्र सरकारच्या ओबीसींप्रतीच्या उदासिनतेमुळे राजकीय आरक्षण धोक्यात सापडले आहे. ट्रिपल टेस्ट आणि इम्पिरीकल डाटा दाखल न केल्यामुळे सुप्रीम कोर्टानेसुद्धा ते फेटाळले आहे. नेमलेल्या मागास आयोगाला तरतुदीनुसार वित्तपुरवठा तसेच त्या संबंधीची आवश्यक उपलब्धततेचा अभाव. परिणामी आयोग हतबल असून डाटाच तयार केलेला नाही. ओबीसींच्या राजकीय आरक्षणाची हत्या करणा-या ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणाची जाणीव करुन देण्यासाठी आणि तात्काळ ट्रिपल टेस्ट आणि डाटा दाखल करण्यास भाग पाडण्यासाठी तमाम ओबीसी समाजबांधवांनी आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केंद्रेंनी केले आहे.