27.4 C
Latur
Tuesday, September 27, 2022
Homeनांदेडटाटा सुमोची दुचाकीला धडक, एक ठार, एक गंभीर

टाटा सुमोची दुचाकीला धडक, एक ठार, एक गंभीर

एकमत ऑनलाईन

नांदेड : भरधाव वेगातील टाटा सुमोने दुचाकीला दिलेल्या जबर धडकेत एक तरुण ठार झाला. तर अन्य एक जण गंभीर जखमी झाला. ही घटना नरसी-गडगा (ता.नायगाव) मुख्य रस्त्यावर रविवारी दुपारी घडली. अपघातानंतर आजूबाजूच्या लोकांनी धाव घेऊन जखमींना रुग्णालयात दाखल केले. दरम्यान हे दोन्ही तरुण सख्खे चुलतभाऊ असल्याची माहिती पुढे आली आहे.

या अपघाताबाबत मिळालेली माहिती अशी की, नायगाव तालुक्यातील औराळा येथील दोन सख्खे चुलतभाऊ रविवारी दुपारी (एम.एच.२६-सीबी-६५५४) या दुचाकीवरून नरसीमार्गे अहमदपूरकडे कामानिमित्त जात होते. नरसी-गडगा रस्त्यावर येताच दुपारी साडेचारच्या सुमारास गडगा शिवारात भरधाव वेगात येणा-या एम.एच.२९-ए.डी.४१८० या टाटा सुमोने दुचाकीस समोरून जबर धडक दिली. या जबर धडकेत दुचाकीवरील दोन्ही तरुण रस्त्याच्या खाली फेकले गेले. यात ते गंभीर जखमी झाले. अपघात होताच आजूबाजूच्या लोकांनी दोन्ही जखमी तरुणांना मदत करून उपचारासाठी रुग्णालयात हलविले.

त्यानंतर नायगाव ठाण्यातील पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन अपघाताची माहिती घेतली. दरम्यान उपचारादरम्यान दीपक जगदेराव पवार (वय २९, रा.औराळा) याचा मृत्यू झाला. तर त्याचा चुलत भाऊ संतोष पवार याच्यावर नायगावच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार करून नांदेड येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. या अपघातात पल्सर दुचाकीचा चुराडा झाला तर टाटा सुमोच्या समोरील भाग चक्काचूर झाला होता.

 

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या