नांदेड : राज्यातील नव्या सरकारमध्ये मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे तर उपमुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस निवड झाली आहे. मुख्यमंत्री पदाने फडणवीस यांना हुलकावणी दिल्याने भाजपात सन्नाटा होता़ याबाबत दैनिक एकमतमध्ये नांदेड भाजपा में इतना सन्नाटा क्यों है भाई या मथळयाखाली शनिवारी प्रसिद्ध झालेल्या बातमीने चांगलाच हंगामा झाला. यानंतर भाजपाला नव्या सरकारच्या निवडीचा आनंदोत्सव साजरा करण्याचा मुहूर्त मिळाला आहे.
उद्या दि़ ३ जुलै रोजी मुंबई येथुन खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांचे नांदेडमध्ये आगमन होताच हा आनंदोत्सव साजरा करण्यात येणार आहे. राज्यात गेल्या अडीच वर्षांपूर्वी महायुतीला मतदान करत जनतेने बहुमताचा कौल दिला होता़ पहिल्याच दिवसापासून हे सरकार अस्थिर होते. भ्रष्टाचार, अनियमितता, विश्वास अशा अनेक बाबतीत सतत चर्चेत राहिलेल्या महाविकास आघाडी सरकारमधील दोन मंत्र्यांना जेलची हवा खावी लागत आहे.
त्यामुळे जनतेच्या विश्वासाला तडा दिलेले हे सरकार कोसळणार हे राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी ठणकावून सांगितले होते. त्यानुसारच एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केल्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार कोसळले तर हिंदुत्ववादी सरकार स्थापन करण्यासाठी नव्या सरकारचे शिल्पकार देवेंद्र फडणवीस यांनी मनाचा मोठेपणा दाखवत एकनाथ शिंदे यांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी बसवले, असा दावा भाजपाने केला आहे. परतंू मुख्यमंत्री पदाने फडणवीस यांना हुलकावणी दिल्याने नांदेड जिल्ह्यात नव्या सरकार स्थापनेचा कोणताच जल्लोष साजरा झाला नाही. यामुळे भाजपात सन्नाटयाचे वातावरण होता.
याबाबत दैनिक एकमतमध्ये नांदेड भाजपा में इतना सन्नाटा क्यों है भाई या मथळयाखाली शनिवारी प्रसिद्ध झालेल्या बातमीने चांगलाच हंगामा झाला. यानंतर भाजपाला नव्या सरकारच्या निवडीचा आनंदोत्सव साजरा करण्याचा मुहूर्त मिळाला आहे. सरकार स्थापनेपासून खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर हे मुंबईत तळ ठोकुन होते. यानंतर ते दि़ ३ जुलै रोजी सकाळी साडेआठ वाजता देवगिरी एक्सप्रेसने नांदेड रेल्वे स्थानकावर दाखल होणार आहेत.
खा. चिखलीकर यांच्या उपस्थितीत नांदेड शहरातील डॉ़ बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून या आनंदोत्सवास सुरूवात होणार आहे़ त्यानंतर महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले आणि अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून हा आनंद उत्सव खा़ चिखलीकर यांच्या साई सुभाष कार्यालय येथे समाप्त करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, पदाधिकारी, लोकप्रतिनिधींनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन भाजपाचे जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर, महानगर अध्यक्ष प्रवीण साले यांनी केले आहे.