18.9 C
Latur
Friday, October 22, 2021
Homeनांदेडअन् हिरकणीचा प्रवास अखेरचा ठरला...

अन् हिरकणीचा प्रवास अखेरचा ठरला…

एकमत ऑनलाईन

नांदेड : रस्ते सुरक्षाविषयी माहिती देण्यासाठी राज्यातील दहा जिल्हयाच्या यात्रेवर साता-याचा हिरकणी महिला रायडर्सचा ग्रुप निघाला होता.मात्र या ग्रुपमधील एका हिरकणीचा भोकर फाट्याजवळ झालेल्या अपघातात मृत्यु झाला.अन् हिरकणीचा हा अखेरचा प्रवासच ठरला.सोबतच रेणुकादेवी,सप्तश्रृंगीचे दर्शनही हुकले. ऐन नवरात्र उत्सवात घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे सर्वांचे मन सुन्न झाले आहे.

राज्यातील सातारा येथील हिरकमणी महिला रायडर्सचा ग्रुप विविध सामाजिक उपक्रम व चळवळीसाठी प्रसिद्ध आहे.नवरात्र उत्साहात काही तरी वेगळी जनजागृती करावी ही उमेद घेऊन महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सर व रस्ते सुरक्षा जनजागृतीसाठी यात्रा काढण्याचा निर्णय घेतला.राज्यातील दहा जिल्हे, २५ तालुके, एक हजार ८६८ किलोमीटर प्रवास करुन दि.१५ सातारा येथे या यात्रेची सांगता करण्याचे ठरले आणि या यात्रेला दि.१० रोजी सुरुवात झाली. ग्रुप प्रमुख मनिषा फरांदे यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या यात्रेत शुभांगी पवार, अंजली शिंदे, मोनिका निकम (जगताप), अर्चना कुकडे, केतकी चव्हाण, ज्योती दुबे, श्रावणी बॅनर्जी, भाग्यश्री केळकर यांचा समावेश होता. या यात्रेला सातारा येथील पवई नाका परिसरातील शिवतीर्थपासून छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांच्या उपस्थित प्रारंभ झाला होता. याचे फोटोही झळकले आणि उत्साहाने प्रवास सुरू झाला.

कोल्हापूरची महालक्ष्मी, तुळजापूरची तुळजाभवानी, माहूरची रेणुका, वणीची सप्तश्रृंगी दर्शन असे ठरले होते.यानूसार महालक्ष्मी व तुळजाभवानी मातेचे दर्शन घेऊन सर्व हिरकणी मंगळवारी सकाळी नांदेडमार्गे निघाल्या होत्या.परंतू नियतीने पुढे काहीतरी वेगळेच वाढून ठेवले होते. गेल्या वर्षभरापासून होत असलेल्या नांदेड-नागपूर-तुळजापुर या राष्ट्रीय महामार्गावरील खड्ड्यांनी भोकर फाटा परिसरात पोहचताच शुभांगी संभाजी पवार वय ४२ रा.सातारा ही हिरकणी कंटेनरच्या तावडीत सापडली. यात शुभांगी पवार याचा मृत्यू झाला आणि हिरकणीचा हा प्रवास अखेरचा ठरला. या दुर्दैवी घटनेमुळे सर्वांचे मन सुन्न झाले आहे. या अपघाताने आम्ही सुन्न पडलो आहोत. जवळची एक हिरकणी आम्ही गमावली आहे. अपघात झाल्याबरोबर जिल्हा प्रशासन ज्या तत्परतेने धावून आले म्हणून आम्हाला सावरता आले अन्यथा आमचे सारेच अवघड होते. अशी भावून प्रतिक्रीया या गटातील मोना निकम हिने दिली. मोना निकम या सातारा पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेत कार्यरत आहेत.

जिल्हा प्रशासन मदतीला धावले
जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांना या अपघाताची माहिती मिळताच तालुका दंडाधिकारी किरण अंबेकर यांना सूचना करुन आठ हिरकणी व इतर सदस्यांना विशेष वाहनातून नांदेडला आणले तर यात बळी पडलेल्या शुभांगी पवार हिचे शवविच्छेदन व कायदेशीरबाबी पूर्ण करुन विशेष रुग्णवाहिनीव्दारे हे पार्थीव साता-याला पाठविले तर त्यांची वाहने इतर वाहनातून पोहंचविण्याची व्यवस्था करण्यात आली असे, डॉ. विपीन यांनी सांगितले.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या