माहूर : माहूर पुरवठा विभागातून शासन मान्य रास्त भाव दुकानदाराने मार्च महिन्यातच पंतप्रधान गरीब कल्याण योजनेच्या धान्याची उचल केली असल्याची बाब तहसिल कार्यालयाच्या पुरवठा विभागाच्या दि. २३ जूनच्या पत्रात नमुद आहे.परंतु जून महिन्याच्या शेवट पर्यंतही रास्त भाव दुकानदाराकडून त्याचे वाटप झाले नाही. त्यामुळे गोरगरीब जनता या योजनेच्या लाभापासून वंचित राहिली आहे.
केंद्र सरकारच्या पंतप्रधान गरीब कल्याण योजनेच्या माध्यमातून रास्त भाव दुकानदारा मार्फत गोरगरीब जनतेला विनामूल्य धान्य पुरवठा केला जातो.परंतु मार्च महिन्याचा धान्य पुरवठा जून महिना संपत आला तरी गरीब जनतेला धान्य मिळाले नाही. या संदर्भात पुरवठा विभागाचे प्रमुख सुरेश जुंकुटवार यांचेशी भ्रमणध्वनी वरून संपर्क केला असता ई पॉश मशीनवर डाटा उपलब्ध न झाल्याने तसेच वाहतूक गूत्तेदाराने वेळीच धान्य न पोहचविल्याने गोरगरीब जनता धान्य मिळण्यापासून वंचित राहिली असल्या बाबतचा अहवाल वरिष्ठाकडे सादर केल्याचे त्यांनी सांगितले.
रास्त भाव दुकानदार संघटनेचे तालुकाध्यक्ष नागोराव वनदेव सुर्वे यांनी पंतप्रधान गरीब कल्याण योजनेचे मार्च महिन्याचे धान्य ६ जून रोजी मिळाल्याचे सांगितल्याने संभ्रम निर्माण झाला आहे. पुरवठा विभागाच्या पत्रात मार्च महिन्याचे धान्य मार्च महिन्यातच उचल झाल्याचे स्पष्ट दिसून येते, तर रास्तभाव दुकानदार संघटनेचे तालुकाध्यक्ष नागोराव सुर्वे म्हणतात सदरचे धान्य ६ जूनला मिळाले, हा काय गोंधळ आहे, असा प्रश्न रुई येथील सरपंच निळकंठ मस्के यांनी उपस्थित केला आहे.