लोहा : सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांचा उन्हाळी सुटीतील शालेय पोषण आहाराचा निधी शाळांच्या बँक खात्यात जमा केला असून, शाळांनी हा निधी विद्यार्थी किंवा त्यांच्या पालकांच्या खात्यात जमा केल्याचा अहवाल अद्यापही गटशिक्षणाधिका-यांना सादर केला नसल्याची माहिती पुढे आली आहे. आता तत्काळ हा निधी विद्यार्थी किंवा त्यांच्या पालकांच्या बँक खात्यात वर्ग करावा, असे गटशिक्षणाधिकारी रवींद्र सोनवणे यांनी शाळांना बजावले आहे.
लोहा तालुक्यातील २0२१च्या उन्हाळी सुटीतील शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत इयत्ता ६ ते ८ च्या पात्र लाभार्थ्यांचा प्रति लाभार्थी ३१५ रूपयांप्रमाणे निधी सर्व शाळांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात आला आहे. हा निधी थेट विद्यार्थी/ पालकांच्या खात्यात जमा करण्याबाबत शाळांना कळविण्यात आले असले तरी अद्याप एकाही शाळेने लाभार्थ्यांच्या बँक खात्यात निधी जमा केल्याचा अहवाल सादर केलेला नाही. शिक्षण संचालक याबाबत दररोज आढावा घेत असूनही शाळा याबाबतचा अहवाल सादर करीत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. आता सदर प्रकरणी दोन दिवसात कार्यवाही करून अहवाल सादर करावा, असे आवाहन सोनटक्के यांनी म्हटले आहे.