नांदेड : माझ्या अंगणात का थुंकलास या किरकोळ कारणासाठी छोट्या भावाने मोठ्या भावाच्या छातीत खंजीरने वार करून त्याचा खून केला़ ही खळबळजनक घटना शिवरायनगर भागात रविवारी सकाळी ८ वाजता घडली. पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली असून मारेकरी आरोपीस ताब्यात घेतले आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, शिवरायनगर भागात सतिश बळीराम तुपसमिंदर आणि त्यांचा छोटा भाऊ एकनाथ बळीराम तुपसमिंदर हे एकमेकांच्या शेजारी राहतात. रविवारी सकाळी ८ च्या सुमाास सतिश तुपसमिंदरशी माझ्या अंगणात का थुंकले यावरून छोटा भाऊ एकनाथने वाद घातला. हा वाद वाढत गेला आणि एकनाथ तुपसमिंदरने चाकूचे दोन घाव सतिश तुपसमिंदरच्या छातीत मारले. जखमी झालेल्या सतिशला शेजा-यांनी शासकीय रुग्णालयात नेले मात्र दुर्देवाने दवाखान्यात पोहचण्याअगोदरच त्यांचा मृत्यू झाला होता.
या घटनेची माहिती मिळताच भाग्यनगरचे पोलिस निरीक्षक सुधाकर आडे, त्यांचे अनेक सहकारी, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर यांनी घटनास्थळी जाऊन माहिती घेतली. यानंतर मारेकरी एकनाथ बळीराम तुपसमिंदर वय ३५ यास भाग्यनगर पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. सदर वृत्त लिहीपर्यंत या प्रकरणी गुन्हा दाखल कररण्याची प्रक्रिया सुरू होती़.