नांदेड : जिल्ह्यात ऐन सनासुदीच्या तोंडावर चोरट्यांनी धुमाकुळ घातला असुन, मागील दोन दिवसात तीन चोरीच्या घटनेत जवळपास अडीच लाखाचा मुद्देमाल लंपास केल्याच्या घटना घडल्या. एका ठिकाणी चोरट्यांनी किराणा दुकान फोडले, तर अन्य चोरीच्या दोन घटनेत एक कार्यालय व कॉटन मिल फोडून नगदी रक्कम आणि साहीत्य लंपास केले. या प्रकरणी संबंधीत पोलिस ठाण्यात चोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
सध्या सण समारंभाची रेलचेल सर्वत्र असुन, नागरीक सणासुदीच्या खरेदी कामात व्यस्त आहेत. तर खरीपातील पिक काढणीच्या कामात शेतकरीही मग्ण झाले आहेत. आशात चोरट्यानी जिल्हाभरात धुमाकुळ घातला असुन, नागरीकांत भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. सध्या दिवाळी सण जवळ येत असल्याने महिला व नागरीकांचा सोने,नव्या वस्तु खरेदी करण्याकडे कल जास्त आहे. तर शेतक-यांची खरीपाचे पिक काढणी झाल्याने त्यांच्याकडेही सध्या थोडेफार पैसे जमा झाल्याचे परीस्थिती आहे. याचाच चोरटे फायदा घेतला असुन चोरट्यांनी चो-या करण्याचा सपाटा लावला आहे. दरम्यान मागच्या दोन दिवसात जिल्हयात चोरीच्या तीन घटना घडल्या ज्यात चोरट्यांनी जवळपास अडीच लाखाचा मुद्देमाल लंपास केला आहे.
यात पहिल्या घटनेत नांदेड शहरातील नमस्कार चौक ते महाराणा प्रताप चौक रोडवर फिर्यादी पवन गोविंदराव डुबेवार यांचे पवन ट्रेडर्स या दुकानाचे कोणीतरी अज्ञात चोरट्यानी दुकानचे टिनपत्रा वाकवुन आत प्रवेश केला. प्रवेश करून चोरट्यांनी दुकानातील जवळपास एक लाख ५३ हजार २०० रूपयाचा माल चोरून नेला. यावरून पवन गोविंदराव डुबेवार यांया फिर्यादीवरून विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दुस-या घटनेत किनवट तालुक्यातील मौजे सारखणी येथे फिर्यादी सचिन अनिल जाधव यांच्या केसुला एलईडी लाईटींग मॅन्यूफॅ क्चरच्या कार्यालयातुन चोरटयांनी कार्यालय बंद असताना शटर वाकवुन कार्यालयाच्या आत प्रवेश करून कार्यालयातील रोख रक्कम व साहित्य असा एकुण ५८ हजार रूपये कि मतीचा मुद्देमाल लंपास केला. या प्रकरणी सिंदखेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तर तिस-या घटनेत भोकर शहरातील फिर्यादी जगदीश काशीराम शर्मा हे काम करत असलेल्या मंजीत कॉटन मिलच्या टिनशेडमधुन चोरटयांनी आत प्रवेश करून शेडमध्ये ठेवलेले आठ लोखंडी वजन करण्याचे धोंडे ज्याची किंमत अंदाजे २६ हजार ४०० रूपये एवढी होती ती अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले. दरम्यान जगदीश काशीराम शर्मा यांच्या फिर्यादीवरून भोकर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या चोरीच्या तीनही घटनेत अडीच लाखाचा मुद्देमाल चोरीस गेला. सततच्या चोरीच्या घटनेला नागरीक कंटाळुन गेले असुन यामुळे भीतीचे वातावरण पसरले आहे. या चोरटयांचा कायमचा बंदोबस्त करण्यात यावा आशी मागणी सामान्य नागरीकातुन होत आहे.