नांदेड : शहरातील कापूस संशोधन केंद्राजवळ डोळ्यात मिरची पुड टाकून तलवारीच्या धाकावर एका व्यापा-यास लूटल्याची घटना दि. १५ मे च्या रात्री घडली होती. या प्रकरणातील तीन आरोपींना २४ मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
सय्यद अतिक सय्यद रशिद यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ते दि. १५ मेच्या रात्री आपली स्कूटी क्रमांक एमएच २६ सीए ५४९८ वर बसून दुकानात आठवडी बाजारात जमा झालेली रक्कम स्कूटीच्या डिक्कीत घेवून घराकडे जात असताना त्यांना शहरातील कापूस संशोधन केंद्राजवळ तीघांनी अडवले.
तसेच त्यांच्या डोळ्यात मिरची पुड टाकून तलवारीचा धाक दाखवून डिक्कीत ठेवलेले साडे चार लाख रूपये रोख व स्कूटी घेवून लुटारू फरार झाले. या प्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून, घटनेनंतर पोलिसांनी सोहेल खान शबीर खान, नुर खान हुसेन खान पठाण व सय्यद ताहेर सय्यद अब्दूल अशा तीन आरोपींना ताब्यात घेतले. तीनही आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना २४ मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. तर या प्रकरणाचा अधिक तपास पोनि अशोक घोरबांड यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि कोरे हे करीत आहेत.