नांदेड : जुन्या भांडणाच्या कारणातून माहूर तालुक्यातील गोकुळगाव येथे ८ जणांच्या एका गटाने केलेल्या हल्लयात एकाचा मृत्यू व एक जण गंभीर जखमी झाला होता. या प्रकरणातील अतिरिक्त सत्र न्यायाधीश अशोक धामेचा यांनी तिघांना जन्मठेपेच्या शिक्षेसह प्रत्येकी ६ हजार रुपये रोख दंड अशी शिक्षा ठोठावली आहे.
या घटनेची माहिती अशी की, गोकुळगाव ता.माहुर येथे दि. ९ सप्टेंबर २०१८ रोजी सायंकाळी साडेचार वाजता वाजता बुध्दभूषण गुलाब भगत, आतिश कांबळे, हर्षवर्धन मंडल, भूषण कांबळे, आदर्श कांबळे, संतोष नगराळे आणि किरण भगत असे सर्व जण डॉ.आंबेडकर चौकात गप्पा मारत होते़ या ठिकाणी येऊन प्रितेश विजय मानकर वय (२७), सतिश विजय मानकर (२८), रुपेश विजय मानकर (३२), देवानंद नथु भगत (४६), गौतम नथु भगत(५६), विजय एकनाथ मानकर (५०), कमुबाई विजय मानकर (४५), निर्मलाबाई गौतम भगत (५१) या सर्वानी जुन्या भांडणाच्या कारणातून सर्वप्रथम वृद्ध व्यक्ती आनंद केशव भगत यांच्या डोळ्यात मिचीर्ची पुड टाकली आणि चाकुने त्यांच्यावर हल्ला केला.
तसेच त्यांच्यासोबत असलेला सदानंद मुकींदा भगत यालाही अनेक ठिकाणी चाकुने मारून गंभीर जखमी केले. या बाबतची तक्रार किरण आनंद भगत यांनी दिली. त्यावेळी किरण भगत आणि इतरही जण जखमी झाले होते. या तक्रारीवरुन सिंदखेड पोलिसांनी ३०२, ३०७ यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला होता़ या प्रकरणाचा तपास सिंदखेडचे तत्कालीन सहाय्यक पोलिस निरीक्षक मल्हारी शिवरकर यांनी करून ८ आरोपींना अटक केले आणि त्यांच्याविरुध्द न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. जिल्हा न्यायालय नांदेड येथे हा सत्र खटला क्रमांक १६८/२०१८ या क्रमांकानुसार सुरू होता.
न्यायालयाने या प्रकरणी एकूण १२ जणांची साक्ष नोंदविली़ त्यात जखमी झालेला साक्षीदार सदानंद भगत आणि वैद्यकीय अधिकारी यांच्या साक्षी आणि पुरावे महत्वपूर्ण ठरले. सरकार पक्षाकडून जिल्हा सरकारी अभियोक्ता अॅड. आशिष गोदामगावकर यांनी बाजू मांडली़ न्यायालयाने उपलब्ध पुराव्यानुसार गुन्हेगारांमधील प्रितेश विजय मानकर, सतिश विजय मानकर हे दोन सख्ये बंधू आणि देवानंद नथु भगत सर्व रा. गोकुळगाव ता.माहुर या तिघांना आनंद केशव भगत यांचा खून करणे आणि सदानंद मुकींदा भगत यांच्यावर जिवघेणा हल्ला करणे या सदराखाली दोषी जाहीर केले. सिंदखेड पोलिस स्टेशनचे पोलीस अंमलदार दिलीपसिंघ मल्ली यांनी पैरवी अधिका-याची भुमिका पार पाडली. या प्रकरणात इतर पाच जणांची या खटल्यातून मुक्तता झाली आहे.