नांदेड : कॉलेजातील आठवणींना उजाळा देत नांदेडच्या वसंतराव नाईक महाविद्यालयात १९९५ च्या पदवी बॅचच्या माजी विद्यर्थ्यांचा स्नेहमेळावा रविवार दिनांक १७ जानेवारी रोजी उत्साहात पार पडला. मेळाव्याच्या निमित्ताने परत एकदा तब्बल पंचवीस वर्षांनी एकत्र आलेले सर्व माजी विद्यार्थी आठवणीत हरवून गेले होते. वर्ग मित्र भेटल्याचा आनंद सर्वांच्याच चेह-यावर दिसत होता.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शेखर घुंगरवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात प्रा.ओ.एम. जायस्वाल, प्रा.एस.ए. पठाण, प्रा.डॉ. खुशाल जायेभाये, प्रा. डॉ. जी. वेणूगोपाल, प्रा. भाईदास चित्ते, प्रा. करडखेडकर मॅडम, प्रा. व्ही. पी.गोसावी मॅडम, प्रा. डॉ. एस.एल. शेट्ये, किसनराव रावणगावकर आदींची उपस्थिती होती. यावेळी प्रायार्च डॉ. शेखर घुंगरवार यांनी स्नेहमेळयानिमित्त माजी विद्यार्थ्यांनी प्राध्यापकांची भेट घडवून आणल्या बद्ल सर्व माजी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. वसंतराव नाईक महाविद्यालयाचे विद्यार्थी वेगवेगळया क्षेत्रात काम करीत असून त्यांनी कॉलेजचे नाव उज्ज्वल केले आहे. अशा शब्दात घुंगरवार यांनी आपल्या भावना व्यक्त करीत शुभेच्छा दिल्या.
प्रारंभी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन व दीप प्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. त्यानंतर अर्चना तांबोळी-शेवाळकर लिखीत अर्चनायन काव्यसंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी अर्चना तांबोळी यांनी स्वागत कविता सादर केली. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांचा माजी विद्यार्थ्यांच्या वतीने शॉल व पुष्पहार देवून सत्कार करण्यात आला.
त्यानंतर माजी विद्यार्थ्यांनी आपला वैयक्तिक परिचय करुन दिला. गुरुपेक्षा शिष्य मोठया पदावर गेला तर गुरुचे मोठेपण असते असे मत प्रा. व्ही.पी. गोसावी मॅडम यांनी व्यक्त केले. प्रा. जायस्वाल यांनी ओघवत्या शैलीत जुन्या आठवणींना उजाळा दिला. प्रा.डॉ. एस.ए. पठाण यांनी मार्गदर्शन करुन गॅदरींगच्या वेळेला गायलेलं दो रास्ते मधील छुप गये नजारे ओय क्या बात होगई… हे गीत गाऊन उपस्थितांची मने जिंकली. या गाण्यावर माजी विद्यार्थ्यांनी ठेका धरला होता. प्रा.डॉ. खुशाल जायेभाये, प्रा.डॉ. जी. वेणूगोपाल, प्रा. भाईदास चित्ते, प्रा. करडखेडकर मॅडम, प्रा. डॉ. एस.एल. शेट्ये यांनीही मनोगत व्यक्त केले.
महाविद्यालयाचे हे विद्यार्थी १९९५ साली केवळ बाहेर पडलेले नसून ते स्थिर भविष्यासाठी ज्ञानाची परिपूर्ण शिदोरी घेऊन कर्तुत्वसंपन्न होण्यासाठी बाहेर पडलेले माजी विद्यार्थ्यी आहेत. यातील बहुतांश माजी विद्यार्थी शिक्षक आहेत. अधिकारी, बडे राजकारणी, पत्रकार, जनसंपर्क अधिकारी, डॉक्टर, वकिल, निवेदक, समाजसेवक, उद्योजक, त्याच प्रमाणे आदर्श गृहिणी आहेत. ज्यांचा ऋणानुबंध आजही या कॉलेजशी जोडलेला आहे. या मेळाव्यातून माजी विद्यार्थ्यांथी आज कुठे-काय करताहेत यांची माहिती कॉलेजच्या प्रशासनाला मिळाली आहे.