नांदेड: प्रतिनिधी
महापालिकेकडून कर वसूली मोहिम अधिक तीव्र करण्यात आली असून, सूचना देवूनही मालमत्ता कर न भरणा-या दोन मालमत्ता धारकांचे दोन नळ व एक ड्रेन जोडणी खंडीत करण्यात आली आहे़
महापालिका आयुक्त डॉ़सुनिल लहाने, अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम, उपायुक्त डॉ पंजाब खानसोळे यांनी मालमत्ता कर व पाणी कर वसुलीसाठी क्षेत्रीय अधिकारी यांना कर भरणा न करणा-यांवर कारवाई करण्याच्या सुचना दिल्या होत्या त्यानूसार दि़२५ मार्च रोजी क्षेत्रीय क्षेत्रीय कार्यालय क्रमांक २ अशोकनगर अंतर्गत एका मालमत्तेवर १ लाख ८० हजार ६१३ रूपयांचा कर थकीत असल्याने मालमत्तेचे नळ व ड्रेनेज जोडणी खंडित करण्यात आली.
क्षेत्रीय अधिकारी डॉ़ मिर्झा फरतुल्लाह बेग, रणजीत पाटील, वसंत कल्याणकर व पथकाने ही कारवाई केली. तर क्षेत्रीय कार्यालय क्रमांक ४ वजीराबाद अंतर्गत मिल एरिया भागात एका मालमत्तेवर १ लाख १० हजार ५८२ रूपयाचा कर थकीत असल्याने वॉरंट बजावण्यात आला होता.
संबंधित मालकाने कर भरणा करण्यास नकार दिल्याने सदर मालमत्तेचे नळ जोडणी खंडित करण्यात आली. सदरची कारवाई क्षेत्रीय अधिकारी संजय जाधव व श्याम कानोटे यांनी पार पाडली़