देगलूर प्रतिनिधी (नरस्ािंग अन्नमवार) : मोठा गाजावाजा करत केंद्र सरकारने उज्ज्वला योजनेअंतर्गत महिलांना अगदी शंभर रुपयात गॅस जोडणी दिली, मात्र काही दिवसांतच दैनंदिन वापरातील सिलेंडरचे दर मात्र हजाराच्या घरात गेल्याने पुन्हा उज्वलाच्या डोक्यावर सरपणाची मोळी घेण्याची वेळ आली आहे.
पंतप्रधान उज्वला योजनेअंतर्गत ग्रामीण भागातही घरोघरी स्वयंपाकाचा गॅस पोहोचला. अगदी शंभर रुपयांपासून सुरुवातीला महिलांना गॅस जोडणी मिळाली त्या आनंदाच्या भरात भारावून गेलेल्या अनेक उज्वला महिला डोक्यावरील सरपणाची मोळी, घरातील चुलीपासून आता सुटका मिळणार म्हणून आनंदाने भारावून गेल्या होत्या. परंतु वाढत्या महागाईमुळे त्यांचा हा आनंद फार काळ टिकला नाही. एकदा मिळालेला सिल्ािंडर पुन्हा भरून घेण्यासाठी महागाईमुळे कठीण झाले आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा ग्रामीण भागात घरोघरी मातीच्या चुली दिसून येत असून गॅस शेगडी आणि सिलेंडर बाजूला पडल्याचे चित्र आहे.
ग्रामीण भागातील महिला सक्षम व्हावी आणि तिलाही सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी प्रत्येक कुटुंबाला उज्वला योजना अंतर्गत गॅस जोडणी देण्यात आली विशेषता उज्वला योजना सुरू होताच ग्रामीण भागात मिळणारे केरोसीन बंद झाली, त्यामुळे घरोघरी गॅस सिलेंडर दिसू लागले होते. मध्यंतरीच्या काळानंतर गॅस सिल्ािंडरचे भाव वाढत गेले तर आज रोजी १००० रुपयापेक्षा जास्त भाव झाल्याने ग्रामीण भागात सिलेंडर भरून घेणे अवघड बनले आहे.
परिणामी पुन्हा एकदा खेडोपाडी स्वयंपाक घरात चुली पेटताना दिसत आहेत. सध्या स्थिती तर शेतशिवारात जळण मिळत नसल्याने फार मोठी अडचण निर्माण झालेली आहे. या स्थितीत मिळेल तो लाकूडफाटा जमा करून कुटुंबाची भूक भागविण्याची वेळ महिलांवर आलेली आहे. योजनेत गॅस जोडणी मिळाली १०० रुपयांना, परंतु सिलेंडर झाले हजाराला असे म्हणत ग्रामीण भागातील उज्वलाच्या डोक्यावर पुन्हा एकदा सरपणाची मोळी आलेली दिसत आहे.
मागील वर्षी उज्वला योजनेअंतर्गत शंभर रुपयांमध्ये गॅस कनेक्शन मिळाले त्यामुळे आता धूर आणि सरपण यापासून सुटका होईल झटपट स्वयंपाक होईल या आशेवर आनंदात होतो आता मात्र सिलेंडर भरून घ्यायचे म्हटले तर १००० रुपये मोजावे लागत असून हे शक्य नसल्याने पुन्हा एकदा चुरस भेटावी लागत आहे. निदान आम्हा उज्वला योजना अंतर्गत येणा-या महिलांना तरी स्वस्तात मिळावे ही अपेक्षा ग्रामीण भागातील महिला दैनिक एकमतशी बोलताना व्यक्त केली.