24.4 C
Latur
Thursday, August 18, 2022
Homeनांदेडअस्थिर सरकारमुळे नगरसेवकांची चिंता वाढली

अस्थिर सरकारमुळे नगरसेवकांची चिंता वाढली

एकमत ऑनलाईन

नांदेड : शिवसेनेतील बंडखोरीमुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर झाले आहे़ यामुळे नुकतेच जाहीर झालेल्या महापालिकेच्या नव्या प्रभाग रचनेवर बदलाचे सावट घोंगावत आहे़ जर नवे सरकार येऊन प्रभाग रचनेत बदल झाला तर आपले काय होईल या चिंतेने नगरसेवक ग्रासले आहेत. किंवा दोन अथवा चार नगरसेवकांचा फॉम्यूर्ला राबविला जाईल, अशी चर्चा नगरसेवकांत जोर धरत आहे.

नांदेड वाघाळा शहर महापालिकेचा १३ जून रोजी प्रारुप आराखडा प्रसिद्ध झाला आहे. राज्य निवडणुक आयोगाने महापालिकेचा प्रस्ताव धुडकावून गुगल मॅपद्वारे प्रभाग रचनेच्या सीमा निश्चित केल्या आहेत. यापूर्वी २० प्रभागातून ८१ सदस्य निवडून गेले तर ऑक्टोबर २०२२ मध्ये होणा-या निवडणूकीत ३१ प्रभागातू ९२ सदस्य निवडणून जाणार आहेत.

प्रभाग रचनेच्या प्रारुप आराखड्यावर २४ जूनपर्यंत हरकती मागविण्यात आल्या होत्या. यात ५६ आक्षेप दाखल झाले असून त्यावर ५ जुलै रोजी सुनावणी होवून त्याचा निकाल काढला जाणार आहे. मात्र एकीकडे मनपा निवडणुकीच्या प्रारुप आराखड्याची प्रक्रिया सुरु झाली असतांनाच दुसरीकडे महाविकास आघाडीतील सहभागी शिवसेनेचा एक गट एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बाहेर पडला आहे़ या बंडखोरीमुळे आघाडी सरकार अस्थिर झाले आहे.

परंतू भारतीय जनता पक्षाला सरकार स्थापन करण्यास पाठींबा देणार असल्यामुळे राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता वाढली आहे़ यामुळे महापालिकेच्या या नव्या प्रभाग रचनेवर बदलाचे सावट घोंगावत आहे. भाजपा सत्तेवर आल्यास महाविकास आघाडी सरकारने घेतलेले निर्णय बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही. जर सत्ता आली तर भाजपाला पोषक असा प्रभाग रचनेचा प्रारुप आराखडा तयार होवू शकतो.

त्यासाठी सध्या जाहीर करण्यात आलेली प्रभाग रचनेत देखील बदल होण्याची शक्यता वाढल्याने आपले आणि आपल्या प्रभागाचे काय होईल या चिंतेने नगरसेवक ग्रासले आहेत़ राजकीय उलथापालथीचे प्रकरण सध्या सर्वोच्च न्यायालयात गेले आहे़ न्यायालयाचा निर्णय आणि नविन सरकारची भुमिका पुढ काय राहिल हे येणा-या काळात स्पष्ट होईल.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या