लोहा : प्रतिनिधी
एकीकडे शासन सर्व स्तरांवरून विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेत आहे पण त्यांच्याच काही दुटप्पी धोरणांमुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होताना दिसत आहे एकीकडे अनुदानित शाळांना पूर्ण सुविधा देत आहेत आणि विनाअनुदानित शाळा मात्र तशाच ओस पडण्याच्या मार्गावर दिसत आहेत यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होताना दिसत आहे. पुस्तकासारख्या मूलभूत सुविधा शासन पुरवत नाही ही बाब खूप गंभीर आहे असे पालकवर्गातून बोलले जात आहे.
अगोदरच कोरोनाने दोन वर्षे थैमान घातल्याने त्यामध्ये विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान झाले. विद्यार्थ्यांची गुणवत्ता मोठ्या प्रमाणात ढासळली आहे. शाळा काही दिवसांनंतर सुरू होणार आहेत. दोन वर्षांत ओस पडलेल्या शाळा पुन्हा गजबजणार आहेत. पण विनाअनुदानित शाळांना किंवा शाळेतील विद्यार्थ्यांना कोणत्याच सुविधा नसल्यामुळे त्यांच्या पालकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. शासनाच्या दुटप्पी धोरणामुळे अनेक विद्यार्थ्यांचे नुकसान होताना दिसत आहे. विनाअनुदानित शाळांना दुपारचे भोजनसुद्धा दिले जात नाही त्यामुळे शासनाकडूनच होणा-या भेदभावाचा फटका विनाअनुदानित शाळांच्या विद्यार्थ्यांना होताना दिसत आहे. याकडे नांदेड जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष मुख्य अधिकारी यांनी लक्ष द्यावे अशी मागणी जनतेतून होत आहे.
शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तक योजनेअंतर्गत इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक सत्राच्या पहिल्या दिवशी पाठ्यपुस्तके मिळणार असल्याची माहिती गट शिक्षणाधिकारी रवींद्र सोनटक्के यांनी दिली आहे.
समग्र शिक्षा अंतर्गत सर्व शासकीय, जि. प., खाजगी अनुदानित शाळांतील इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके वाटप करण्यात येतात.
पंचायत समिती, लोहा अंतर्गत सर्व जि. प. व खाजगी अनुदानित शाळांतील इयत्ता पहिलीच्या ३६३२, इयत्ता दुसरी – ३७००, इयत्ता तिसरी – ३७०२, इयत्ता चौथी – ३६७५, इयत्ता पाचवी – ३७९४, इयत्ता सहावी – ३९०१, इयत्ता सातवी – ३७६५ व इयत्ता आठवीतील – ३६०२ अशा एकूण २९७७१ विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वाटप होणार आहे.
बालभारती भांडार, लातूरमार्फत अपेक्षित पाठ्यपुस्तकांपैकी ८० टक्के पुस्तके प्राप्त झाली असून उर्वरित पाठ्यपुस्तके लवकरच प्राप्त होणार आहेत. सर्व पाठ्यपुस्तके प्राप्त होताच तालुकास्तरावरून शाळांना पाठ्यपुस्तक वाटपाची प्रक्रिया सुरू होईल.
जिल्हा परिषद नांदेडच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मा. वर्षा ठाकूर-घुगे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) मा. डॉ सविता बिरगे यांच्या मार्गदर्शनानुसार, शाळांनी मागील वर्षीची सुस्थितीतील पाठ्यपुस्तके विद्यार्थ्यांकडून जमा केली असून वाढीव विद्यार्थीसंख्येसाठी या पाठ्यपुस्तकांचा वापर करण्यात येणार असल्याचे गट शिक्षणाधिकारी रवींद्र सोनटक्के यांनी सांगितले आहे.
विनाअनुदानित शाळेतील विद्यार्थ्यांना पूर्ण सुविधा द्या
विनाअनुदानित शाळांना पुस्तके नसल्यामुळे त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे त्यासाठी भेदभाव दूर करून त्यांना मूलभूत सुविधा द्याव्यात अशी मागणी पालकवर्गातून होत आहे. काही दिवसांत शैक्षणिक वर्ष सुरू होणार असल्यामुळे त्यांना लागणारी पुस्तकांची संख्या आणि मध्यान्ह भोजनाची व्यवस्था तात्काळ करावी अशी मागणी जिल्हा परिषद नांदेडच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मा. वर्षा ठाकूर- घुगे यांच्याकडे मुख्याध्यापक कदम यांच्यातर्फे केली जाणार आहे.