नांदेड : मुखेड तालुक्यातील सावळी तलावाजवळ झालेल्या महिलेच्या खुनाचा अखेर मुक्रामाबाद पोलिसांनी उलगडा केला आहे. पैशाच्या देवाण घेवाणीतून वाद झाल्याने या महिलेचा दगडाने ठेचून खून केल्याचे स्पष्ट झाले असून, या प्रकरणात दोन आरोपींना पोलिसांनी गजाआड केले आहे.
मुखेड तालुक्यातील सावळी पाझर तलावानजीक सावरमाळ शिवारातील खाज्यासाब पिंजारी यांच्या शेतातील पत्राच्या शेडसमोर अज्ञात आरोपीने ३५ वर्षीय महिलेचे डोके, चेहरा व पाठीवर दगडाने ठेचून खून केला होता. चार दिवस प्रेत फुगून सडल्याने दुर्गंधी निर्माण झाली होती. याबाबत शेतक-यांनी १५ मे रोजी पोलिसांना दिलेल्या माहितीवरुन मुक्रमाबाद पोलिस ठाण्यात अज्ञात मारेक-याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या खून प्रकरणी तपासाअंती हा मृतदेह प्रेमला उर्फ इंदरबाई बापुराव भेंडेगावकर (रा. बेटमोगरा) यांचा असल्याचे स्पष्ट झाले. मृतदेहाच्या अंगावरील दागिने, मोबाईल व इतर साहित्य पाहून हा मृतदेह प्रेमला उर्फ इंदरबाईचा असल्याचे तिची मोठी बहीण चंदरबाई व नातेवाईकांनी सांगितले होते. या दरम्यान वैद्यकीय अधिका-यांच्या अहवाला आधारे व चंदरबाई यांच्या फिर्यादीवरुन मुक्रमाबाद पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
फौजदार गजानन कांगणे हे प्रकरणाचा तपास करीत होते. उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन सांगळे, सपोनि संग्राम जाधव, पोउपनि गोपीनाथ वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि गजानन कांगणे यांनी तपासाची चक्रे फिरवून खुनाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर तातडीने २६ मे रोजी यातील आरोपी शंकर नामदेव खपाटे (३६) व श्रीराम उद्धव पिटलेवाड (३१, दोघे रा. बेटमोगरा) यांना बेटमोगरा येथून गजाआड केले आहे.
पोलिसी खाक्या दाखविताच आरोपीने पोलिसासमक्ष मयत महिलेशी अनैतिक संबंध होते. शिवाय आर्थिक देवाघेवाणीतून झालेले वाद विकोपाला गेले होते. त्यातूनच मित्राच्या मदतीने सावरमाळ शिवारात तिचा दगडाने ठेचून खुन केल्याची कबुली दिली. या खुनाच्या तपासात हवालदार गुणाजी सुरणर, माधव मरगेवाड, शरीफ पठाण, दिलीप तग्याळकर, चालक पांचाळ आदींनी सहकार्य केले.