अधार्पूर : ग्राहकांच्या सेवेसाठी तत्पर राहूनही उपविभागीय अभियंत्याकडून होणा-या त्रासास कंटाळून अधार्पूर तालुक्यातील विज कर्मचा-यांचे कामबंद आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. यामुळे दैनंदिन कामकाज ठप्प झाले असून ग्रामीण भागातील विद्युत पुरवठ्यात अडथळा निर्माण झाला आहे. वरिष्ठ अधिका-यांनी या अभियंत्याची बदली करावी, अशी मागणी कर्मचा-यांनी केली आहे.
अधार्पूर महावितरण अंतर्गत वरिष्ठ अधिका-यांचा विज बिलवसुलीसाठी दबाव वाढतला आहे. गेल्या काही दिवसांपासून तापमान वाढल्याने वीज मागणी वाढली आहे. यात नियमित देखभाल दुरूस्ती, मान्सून पूर्व दुरूस्ती, ट्रान्सफार्मर बदलणे, लाईनवरील झाडे तोडणे आदीमुळे मानसिक दबावाखाली कर्मचा-यांना दैनंदिन काम करावे लागत आहे. तर मान्सून पूर्व दुरूस्तीसाठी अद्याप कुठलीही व्यवस्था करण्यात आलेली नाही. याबाबत विचारल्यास तुम्ही स्वत:च्या खिशातून पैसे टाकून दुरूस्ती करून घ्या. वसुली का नाही केली, ग्राहक तुमचे पाहुणे आहेत का, स्वत:च्या खिशातून बिल भरा, पगार कपात करतो, शिस्तभंगाची कारवाई करतो अशा धमक्या देवून उपकार्यकारी अभियंता कर्मचा-यांना नाहक त्रास देत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
सदर उपकार्यकारी अभियंता यांची तात्काळ बदली करावी, दुरुस्तीसाठी एजन्सी द्यावी, कर्मचा-यांचा दंड परत द्यावा, अधार्पूर तालुक्यात वाढलेल्या लोकसंख्येनुसार पदभरती वाढवावी अशी मागणी करीत कर्मचा-यांनी कामबंद आंदोलन सुरू केले आहे.
सदर निवेदन राज्याचे ऊर्जा मंत्री, महावितरण प्रादेशिक विभाग, औरंगाबाद, जिल्हाधिकारी, परिमंडळ कार्यालय अधीक्षक अभियंता यांना देण्यात आले आहे. जी.जी. सवंडकर, एल.पी. पुरी, गोविंद चोपडे, जी.के. सुवर्णकार, आर.आर. डोईजड, जी.एस. अलबत्ते, जी.पी. इंगोले, एस.एस. वाघमारे, एस.एस. कानोडे, अब्दुल रहीम, जी.पी. कानोडे आदींसह ३६ जणांच्या या निवेदनावर स्वाक्ष-या आहेत.