27.1 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeराष्ट्रीयचार वर्ष नोकरी करुन परतल्यानंतर पोरगी कोण देणार?

चार वर्ष नोकरी करुन परतल्यानंतर पोरगी कोण देणार?

एकमत ऑनलाईन

‘अग्निपथ’वर कन्हैय्याचा सवाल…
नवी दिल्ली : केंद्र सरकारने ‘अग्निपथ’ योजना जाहीर केल्यानंतर देशातील अनेक राज्यात तरुणांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही या योजनेला विरोध केला आहे.

आता बिहारमधील काँग्रेस नेते कन्हैय्या कुमारनेही या योजनेला विरोध करत केंद्र सरकावर टीका केली. दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी मोदी सरकार आणि या योजनेवर भाष्य केले. ही योजना लागू करण्यापूर्वी केंद्र सरकारने देशातील तरुणांशी संवाद साधला का? विरोधी पक्षांशी चर्चा केली का? असा सवाल कन्हैय्याने विचारला आहे.

केंद्र सरकारने ही योजना आणताना देशातील तरूणांशी संवाद साधणे गरजेचे होते. सैन्यदलात गृहमंत्र्यांचा मुलगा जात नाही, त्यांचा मुलगा बीसीसीआयचा सचिव बनतो, तेथे सर्वसामान्य कुटुंबातील, शेतकरी, कामगार वर्गातील मुले भरती होत असतात. माझ्या कुटुंबातील, नातेवाईकांमधील १६ जण सैन्यात देशसेवा करत आहेत. त्यामुळे, मी अनुभवातून सांगतो की, ही योजना तरुणाईच्या हिताची नाही, असे कन्हैय्या कुमारने स्पष्ट केले.

युवकांना सरकारने ४ वर्षाचे लॉलिपॉप दाखवले आहे. पण, बिहारमधील बेरोजगारीची समस्या गंभीर आहे. सैन्यात भरती नसेल तर येथील युवकांचे लग्न होत नाहीत. या योजनेनुसार एखादा तरुण ४ वर्षे देशसेवा केल्यानंतर निवृत्त होऊन २१ व्या वर्षी घरी येईल, तेव्हा लग्नासाठी त्याला मुलगी कोण देईल, त्याच्याशी लग्न कोण करेल?, असा सवाल कन्हैय्याने विचारला आहे. तसेच, काँग्रेसचा या योजनेला संपूर्णपणे विरोध असल्याचेही ते म्हणाले.

४ दिवसांत ७०० कोटींची संपत्ती खाक
अग्निपथ योजनेला विरोध करण्यासाठी देशभर आंदोलन होत आहे. यात सार्वजनिक मालमत्तेची जाळपोळ केली जात आहे. आंदोलकांनी चार दिवसांत ७०० कोटींची संपत्ती भस्मसात केली. रेल्वेचे ६० डबे, ११ इंजिनांना आगी लावण्यात आल्या. याबरोबरच अनेक मालमत्तांनाही आगी लावल्या. जेवढ्या किमतीची मालमत्ता जाळली, त्यात बिहारला १० नवीन रेल्वे मिळू शकल्या असत्या.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या