लखनौ : उत्तर प्रदेशमध्ये भाजपचे सरकार आल्यापासून ईदच्या दिवशी रस्त्यावर नमाज पठण करणे बंद झाले असल्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे. यावेळी त्यांनी राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या मुद्यालाही अधोरेखित केले. उत्तर प्रदेशात रामनवमीच्या दिवशी कोणतीही जातीय दंगल झाली नसल्याचे त्यांनी सांगितले.
सोमवार दि. २३ मे रोजी पत्रकारांशी बोलताना आदित्यनाथ यांनी ही माहिती दिली. उत्तर प्रदेशात मोठ्या प्रमाणात रामनवमी साजरी करण्यात आली. राज्यात कुठेही हिंसाचार झाला नाही. उत्तर प्रदेशात पहिल्यांदाच रस्त्यावर ईदच्या दिवशी नमाज पठण आणि अलविदा जुमा झाला नाही,असेही योगी आदित्यनाथ म्हणाले.
योगी आदित्यनाथ यांनी यावेळी राज्यात गेल्या पाच वर्षांपासून राखण्यात आलेल्या कायदा-सुव्यवस्थेचेही कौतुक केले. भाजपने विधानसभा निवडणुकीच्या वेळी हा मुद्दा अधोरेखित केला होता. योगी आदित्यनाथ यांनी यावेळी बोलताना २०१७ पासून राज्यात दंगलीची एकही घटना घडली नसल्याचा दावा केला.
याआधी मुझफ्फरनगर, मेरठ, मुरादाबाद आणि इतर ठिकाणी दंगली होत होत्या. कित्येक महिने तिथे कर्फ्यू लावला जायचा. पण गेल्या पाच वर्षात एकही दंगल झालेली नाही, असे योगी आदित्यनाथ यांनी सांगितले. आमच्या सरकारने राज्यातील बेकायदेशीर कत्तलखाने बंद केले आहेत. गायींना निरोगी आणि सुरक्षित ठेवण्यासाठी आम्ही गौशाळा बांधल्या आहेत. धार्मिक ठिकाणांवरुन आम्ही लाऊडस्पीकर हटवले आहेत. आमच्या सरकारने जवळपास ७०० धार्मिक ठिकाणांची पुनर्बांधणी केली आहे, असेही योगी आदित्यनाथ म्हणाले आहेत.