नवी दिल्ली : काँग्रेसच्या तीन दिवसीय चिंतन शिबिरात देशभरातील काँग्रेसचे बडे नेते सहभागी झाले होते. चर्चेसाठी ६ गट तयार करण्यात आले होते. सर्वांच्या प्रस्तावांवर विचारमंथन केल्यानंतर काँग्रेस कार्यकारिणीने शिक्कामोर्तब केले.
बैठकीत यूपीए सरकारच्या कामगिरीचाही उल्लेख करण्यात आला. चिंतन शिबिरानंतर दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सध्याचे मोदी सरकार मागास जातींकडे दुर्लक्ष करीत आहे. काँग्रेसने प्रथमच जात जनगणनेची बाजू मांडली आहे. यावरून काँग्रेस आता ओबीसी कार्डकडे पूर्ण लक्ष देणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
यूपीए सरकारच्या काळात जातीवरून करण्यात आलेली जनगणना सध्याचे सरकार सार्वजनिक करण्यास तयार नाही, असे काँग्रेस पक्षाच्या वतीने सांगण्यात आले. मागासलेल्या जातींना त्यांच्या हक्कांपासून वंचित ठेवायचे आहे, हा त्यामागचा थेट उद्देश आहे. आता काँग्रेस जातींच्या जनगणनेचा डेटा सार्वजनिक करण्यासाठी आणि मागसलेल्यांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी लढा देणार आहे.