नवी दिल्ली : आप नेते आणि नवी दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांना ईडीनं ३० मे रोजी अटक केली आहे. सत्येंद्र जैन यांना ईडीकडून मनी लाँंिड्रग प्रकरणी अटक करण्यात आली आहे. जैन यांच्या जामीन अर्जावर आज दिल्लीतील न्यायालयात सुनावणी पार पडली. आता १८ जून रोजी जैन यांच्या जामीन अर्जाबाबत निर्णय जाहीर होणार आहे. ईडीच्या वकिलांनी सत्येंद्र जैन यांच्याविषयी अचंबित करणारी माहिती दिली. कोरोना संसर्गामुळे स्मृती गेली असून पैसे कुठून आले माहिती नसल्याचे जैन यांनी म्हटल्याचे ईडीने सांगितले.
ईडीचे वकिल अतिरिक्त सॉलिसिटर जनरल एस.वी.राजू यांनी न्यायालयाला ही माहिती दिली. ईडीने जैन यांना पैसे कुठून आले विचारले असता त्यांनी कोरोना संसर्गामुळं स्मृती गेल्याचे सांगितले. दिल्लीतील न्यायालयानं जैन यांची ईडी कोठडी १३ जूनपर्यंत वाढवली होती. त्यानंतर आज सत्येंद्र जैन यांच्या जामीन अर्जावर सुनावणी करण्यात आली. आता १८ जूनला कोर्ट निर्णय देण्याची शक्यता आहे. तर, दुसरीकडे एएसजी राजू यांनी सत्येंद्र जैन यांना एका पानावर जबाब लिहिण्यास २ तास लागतात, त्यामुळे खूप वेळ जातो. तरी देखील सत्येंद्र जैन यांनी पुन्हा जबाब माझा नाही असे म्हणू नये म्हणून त्यांच्याकडून लिहून घेण्यात असल्याचे राजू म्हणाले.