नवी दिल्ली : देशात कोरोनाची रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशात लसीकरण हा रामबाण उपाय मानला जात आहे. देशातील कोरोनाची लढाई लढण्याकरिता कोव्हॅक्सिन आणि कोविशिल्ड या लसींचा मोठा वाटा आहे. आता या दोन्ही लस खुल्या बाजारात विकण्यास केंद्र सरकारकडे शिफारस करण्यात आली आहे. त्यामुळे आता केंद्र सरकार यावर काय निर्णय घेणार, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. मात्र, तसा निर्णय झाल्यास या लस मेडिकल दुकानातही उपलब्ध होऊ शकतात.
समोर आलेल्या माहितीनुसार ड्रग्ज कंट्रोलर ऑफ इंडियाच्या (डीसीजीआय) तज्ज्ञांच्या समितीने शुक्रवारी कोव्हॅक्सिन आणि कोव्हिशिल्डच्या मार्केटिंग अप्रूव्हलसाठी भारत बायोटेक आणि सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने दिलेल्या अर्जाची पडताळणी केली होती. त्यानंतर कोव्हॅक्सिन आणि कोविशिल्ड या लसींना बाजारात विक्रीसाठी उपलब्ध करण्याकरिता केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्था (डीसीजीआय) यांच्या एक्स्पर्ट पॅनलने केंद्र सरकारकडे शिफारस केली आहे. ही शिफारस मान्य झाली तर या दोन्ही लस विक्रीसाठी लवकरच बाजारात उपलब्ध होण्याची दाट शक्यताही व्यक्त केली जात आहे. कारण या दोन्ही लसींच्या उत्पादक कंपन्यांनी या लस खुल्या बाजारात विक्रीसाठी परवानगी देण्यात यावी, अशी मागणी लावून धरली आहे.
सीरम इन्स्टिट्यूटने गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात कोविशिल्ड लसीच्या मार्केटिंगसाठीच्या मंजुरीसाठी अर्ज केला होता, तर भारत बायोटेकनेही कोव्हॅक्सिनच्या मार्केटिंगसाठी नुकताच अर्ज दाखल केला आहे. कोविशिल्ड लसींच्या संपूर्ण मार्केटिंग ऑथोरायजेशनचा विचार करण्यासाठी सरकारकडे आता आवश्यक अशी सर्व माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे, असे ट्विटदेखील सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदर पुनावाला यांनी केले. सीरम इन्स्टिट्यूटच्या कोविशिल्ड लसीला भारतात आपत्कालीन वापरासाठी मंजुरी देण्यात आली होती. देशात कोरोना लसीकरण मोहिमेत सध्या कोविशिल्ड आणि भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन लस वापरली जात आहे.
दरम्यान, या संदर्भात केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेच्या विषय तज्ज्ञ समितीने पाठपुरावा केला आणि त्यानंतर या दोन्ही लस खुल्या बाजारात विक्रीसाठी उपलब्ध कराव्यात अशी शिफारस केंद्र सरकारकडे केली आहे. या शिफारसीवर केंद्र सरकार काय भूमिका घेतील, याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. दरम्यान, या बाबत अंतिम मंजुरीसाठी यासंबंधीचा प्रस्ताव डीजीसीआयकडेच जाणार आहे. त्यानंतर केंद्र सरकार त्यावर विचार करू शकते. दरम्यान, यासंबंधी झालेल्या बैठकीदरम्यान तज्ज्ञ समितीने दोन्ही कंपन्यांकडून सर्व तपशील मागवला होता. खुल्या बाजारात विक्रीची परवानगी म्हणजे कुठल्याही बंधनाविना किंवा राखीव कोट्याविना या लसी थेट बाजारात विकता येणार आहेत. यातून कंपनीला नफा कमावण्याची संधी मिळू शकते. यासाठी या कंपन्यांनी लस विक्रीला खुली परवानगी देण्यासंबंधी सातत्याने पाठपुरावा सुरू केला आहे.