नवी दिल्ली : भारत बायोटेकची ‘कोवॅक्सिन’ कोरोना प्रतिबंधक लस ही २ ते १८ वयोगटातील मुलांसाठी उच्च रोगप्रतिकारक असल्याचा दावा ‘लॅन्सेट’ या विज्ञानविषयक नियतकालिकात प्रकाशित झालेल्या अभ्यास अहवालात करण्यात आला. तसेच भारत बायोटेक इंटरनॅशनल लिमिटेडच्यावतीने शुक्रवारी याची घोषणा करण्यात आली.
यासंदर्भात ‘लॅन्सेट’मध्ये १६ जून रोजी एक अभ्यास अहवाल प्रकाशित करण्यात आला. यामध्ये म्हटले की, भारत बायोटेकने २ ते १८ वयोगटातील निरोगी मुले आणि किशोरवयीन मुलांमध्ये ‘कोवॅक्सिन’ची सुरक्षितता, प्रतिक्रिया आणि रोगप्रतिकारक शक्तीचे मूल्यांकन करण्यासाठी फेज ।।/।।। ओपन-लेबल आणि मल्टीसेंटर अभ्यास केला होता. दरम्यान, जून २०२१ ते सप्टेंबर २०२१ या कालावधीत लहान मुलांमध्ये झालेल्या क्लिनिकल चाचणीमध्ये सुरक्षितता, कमी प्रतिक्रियाकारकता आणि चांगली रोगप्रतिकारकता दिसून आली.
दरम्यान, हा डेटा ऑक्टोबर २०२१ मध्ये सेन्ट्रल ड्रग्ज स्टॅँडर्ड कन्ट्रोल ऑर्गनायझेशनकडे सोपवण्यात आला. त्यानंतर ६ ते १८ वयोगटातील मुलांसाठी आपत्कालिन वापरासाठी या लसीला परवानगी मिळाली. याबाबत भारत बायोटेकचे चेअरमन आणि एमडी डॉ. कृष्णा इल्ला म्हणाले, लहान मुलांना लसीपासून सुरक्षा मिळणे ही अत्यंत महत्वाची बाब आहे. पण आम्हाला आनंद होतोय की, आमच्या ‘कोव्हॅक्सिन’ या लसीने मुलांची सुरक्षा आणि रोगप्रतिकारशक्ती वाढत असल्याचे सिद्ध केले आहे. ‘कोवॅक्सिन’ ही द्रव स्वरुपातील लस आहे. जी २ ते ८ डिग्री सेल्सिअस तापमानात साठवली जाते. या लशीचे आयुर्मान १२ महिने असते, अशी माहितीही डॉ. कृष्णा यांनी दिली.