27.8 C
Latur
Friday, July 1, 2022
Homeराष्ट्रीयगृह, वाहन कर्ज पुन्हा महाग

गृह, वाहन कर्ज पुन्हा महाग

एकमत ऑनलाईन

रेपोदरात ०.५० टक्के वाढ, ईएमआय वाढणार
मुंबई : वाढत्या महागाईमुळे चिंतेत असलेल्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पुन्हा एकदा रेपो दरात वाढ केली आहे. त्यानुसार रेपो दर ४.४० टक्क्यांवरून ४.९० टक्क्यांपर्यंत वाढवला आहे. त्यामुळे आता गृह कर्ज आणि वाहन कर्ज पुन्हा महाग झाले आहे. आता कर्जदारांना वाढीव ईएमआय भरावा लागणार आहे. अर्थात, २० वर्षांच्या मुदतीच्या १० लाखांपर्यंतच्या गृहकर्जासाठी ३०० रुपये ईएमआय वाढणार आहे.

रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी पतधोरण निर्धारण समितीच्या (एमपीसी) बैठकीनंतर रेपो रेटमध्ये वाढ करण्यात आल्याची माहिती दिली. एमपीसीची सोमवारपासून सुरू असलेली तीन दिवसीय बैठक आज संपली. या आर्थिक वर्षातील एमपीसीची ही तिसरी बैठक होती. शक्तिकांत दास यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत समितीच्या पाच सदस्यांनी महागाई आणि आर्थिक विकासावर चर्चा केली. अनियंत्रित महागाई लक्षात घेता रेपो रेट वाढवण्याशिवाय पर्याय नाही, यावर सर्व सदस्यांचे एकमत झाले. त्यानंतर रेपो रेटमध्ये ०.५० टक्के वाढ करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला.

महागाईचा दर उच्चांकी
सरकारी आकडेवारीनुसार एप्रिल २०२२ मध्ये किरकोळ महागाई दर ७.८ टक्के होता. जो मे २०१४ नंतर सर्वाधिक आहे. जानेवारी २०२२ पासून हा दर ६ टक्क्यांच्या पुढे आहे. याचप्रकारे एप्रिल २०२२ मध्ये घाऊक महागाई वाढून १५.८ टक्क्यांवर पोहोचली होती. डिसेंबर १९९८ नंतर हा दर सर्वाधिक होता. सरकारने महागाई नियंत्रणात आणण्यासाठी पेट्रोल आणि डिझेवरील कर, विमान इंधनाचे दर कमी करण्यासोबतच अनेक पावले उचलली आहेत.

यामुळे महागते कर्ज
वाणिज्य बँकांना त्यांच्या व्यवसायाची गरज पूर्ण करण्यासाठी रिझर्व्ह बँक त्यांना अल्प मुदतीचे कर्ज देत असते. हे कर्ज ज्या व्याज दराने दिले जाते, त्याला ‘रेपो रेट’ म्हणतात. रेपो रेट वाढविला गेल्याने बँकांना वाढीव दराने निधी मिळतो. ज्यातून बँकांकडून उद्योजक-व्यावसायिक व सामान्य कर्जदारांना दिले जाणारे कर्जही स्वाभाविकपणे महाग होते.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या