उडुपी : कर्नाटकातील उडुपी जिल्ह्यातील टोलनाक्यावर एका वेगवान रुग्णवाहिकेच्या झालेल्या अपघाताचा धक्कादायक व्हीडिओ बुधवारी समोर आला. उडुपीच्या बिंदूर भागात झालेल्या या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये रुग्णासह एक टोल कर्मचारी आणि रुग्णवाहिकेतील २ वैद्यकीय कर्मचा-यांचा समावेश आहे. त्याचवेळी चालक जखमी झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रुग्णवाहिका एका रुग्णाला उत्तरा कन्नड जिल्ह्यातील होन्नावरा येथे उपचारासाठी घेऊन जात होती. बिंदूर परिसरात असलेल्या राष्ट्रीय महामार्गावरील टोलनाक्याच्या आधी लेनमध्ये दोन थांबे होते. भरधाव वेगात असलेली रुग्णवाहिका जवळ येत असल्याचे पाहून टोल रक्षकाने सर्वप्रथम लाईनमधील स्टॉपर काढण्यासाठी धाव घेतली. त्याने स्टॉपरही काढला होता. वास्तविक या दोन स्टॉपरनंतर अचानक गाय रस्त्यावर आली. या गायीला वाचवण्यासाठी रुग्णवाहिकेच्या चालकाने जोरदार ब्रेक दाबला आणि रुग्णवाहिका रस्त्यावर इतक्या वेगाने घसरली की ती ३६० अंश फिरत टोल बुथच्या केबिनला धडकली. या दुर्घटनेत चार जणांचा मृत्यू झाला.