27.8 C
Latur
Thursday, October 21, 2021
Homeराष्ट्रीयत्या रोग्यांच्या रक्तात शिसे व निकेल धातूचे अंश; आंध्रप्रदेशमधील गुढ रोग

त्या रोग्यांच्या रक्तात शिसे व निकेल धातूचे अंश; आंध्रप्रदेशमधील गुढ रोग

एकमत ऑनलाईन

अमरावती : आंध्रप्रदेशमध्ये दोन दिवसांपुर्वी शेकडो लोक अचानकच गुढ रोगाने ग्रस्त झाले होते. सदर घटनेबाबत नवा खुलासा झाला असून बाधितांच्या रक्तात शिसे व निकेल या धातुंचे अंश सापडल्याचे आढळून आले आहे. दिल्लीतील एम्स मध्ये याबाबत अधिक तपासणीसाठी नमूने पाठविण्यात आले आहेत. आंध्रप्रदेशमधील पश्चिम गोदावरी जिल्ह्यातील एलुरु शहरात ही घटना घडली होती. मात्र दोन दिवसांत संबंधित रोगाने बाधितांच्या रक्ताच्या तपासणीत रक्तात मोठ्या प्रमाणात शिसे व निकेल या घातक धातूंची मात्रा सापडल्याचे आढळल्याने धक्का बसला आहे. जिल्हाधिकारी हिमांशु शुक्ला यांनी याबाबत माहिती दिली.

शुक्ला म्हणाले की, शिसे व निकेल या घातक धातूंचे मोठे प्रमाण हेच रोगाचे कारण असल्याचा शास्त्रज्ञांचा दावा आहे. आम्ही नवी दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान (एम्स)मध्ये तपासणीसाठी आम्ही अधिक नमुने पाठविले आहेत. मात्र जिल्हाधिकारी व शास्त्रज्ञांचा असा दावा असला तरी प्रयोगशाळेत पाठविण्यात आलेल्या पाण्याच्या नमुन्यांमध्ये मात्र पाणी दुषित असल्याचे आढळले नव्हते. परिणामी दोन्ही परस्पर विरोधी दाव्यांनंतर या घटनेमागे नक्की काय कारण आहे,याचे गुढ मात्र कायम राहिले आहे.

कीटकनाशकांची अ‍ॅलर्जी ?
दरम्यान हा आजार कीटकनाशक किंवा डासांच्या नियंत्रणासाठी फवारण्यात येणा-या औषधाच्या अ‍ॅलर्जीने होत असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. आंध्र प्रदेशमधील अधिकारी या दृष्टिकोनातून तपास करीत आहेत. अशाप्रकारच्या औषधांमध्ये ऑरगॅनोक्लोरिनचा वापर केलेला असतो. जगभरात त्याच्या वापरावर बंदी असली तरी भारतात अजुनही वापर चालूच आहे. दुसरीकडे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने या आजाराचं गूढ उकलण्यासाठी एक तज्ज्ञ समिती नेमली असून त्यात पुण्यातील विषाणूतज्ज्ञ डॉ. अविनाश देवशटवार यांचा समावेश आहे. ही समिती मंगळवारी सकाळी एलूरू येथे पोहोचली आहे.

दरम्यान याप्रकरणात भाजपचे खासदार जीव्हीएल नरसिंह राव यांनी ट्विटरवरुन सरकारी वैद्यकीय तज्ज्ञानी त्यांना विषारी ऑरगॅनोक्लोरीन्समुळे ही घटना घडल्याचे सांगितल्याचे म्हटले आहे. मात्र राज्यातील सार्वजनिक आरोग्य संचालक गीता प्रसादिनी यांनी वेगळे मत व्यक्त केले आहे. त्या म्हणाल्या की ही एक शक्यता देखील असू शकते. नक्की कारण शोधण्यासाठी आम्ही चाचणी अहवालाची वाट पाहत आहोत. मागील २४ तासांत एकही केस समोर आली नसून मागील आठवड्यात एका ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.

युद्धपातळीवर आरोग्य सर्वेक्षण
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर हा अज्ञात आजार समोर आल्यानंतर स्थानिक प्रशासनाने त्याचा प्रसार जाणून घेण्यासाठी तब्बल ६२ गावे व प्रभाग सचिवांनी ५७,८६३ घरांमध्ये आरोग्य सर्वेक्षण केले. त्यासाठी ५६ डॉक्टर, तीन मायक्रोबायोलॉजिस्ट,  ६६ परिचारिका, ११७ एफएनओ आणि ९९ एमएनओ ड्युुटीवर लावले आहेत. सध्या १५७ रूग्णांवर उपचार सुरू असून १६८ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. सर्व बाधित व्यक्तींपैकी ३०७ जण इलुरू शहरातील तर ३० जण इलुरुच्या ग्रामीण भागातील आणि तीन डेंडुलुरू मधील आहेत. सध्या बाधित व्यक्तींकडून घेतलेल्या सेरेब्रल फ्लुईड सॅम्पलच्या चाचण्यांच्या रिपोर्टची प्रतीक्षा आहे. तर दुधाचे १० नमुने हैदराबादमधील तरनाकाजवळील सेंटर फॉर सेल्युलर अ‍ॅण्ड मोलिक्युलर बायोलॉजी मध्ये तपासणीसाठी पाठवले आहेत.

अकलूज कडकडीत बंद

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या