24.7 C
Latur
Friday, September 30, 2022
Homeराष्ट्रीयदोन दिवसांत महत्त्वपूर्ण खटल्यांवर सुनावणी

दोन दिवसांत महत्त्वपूर्ण खटल्यांवर सुनावणी

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा आज सेवानिवृत्त झाले. यापूर्वी त्यांनी ५ महत्त्वाच्या खटल्यांची सुनावणी केली. विशेष म्हणजे त्यांच्या निवृत्तीच्या दिवशीच देशाच्या इतिहासात प्रथमच सर्वोच्च न्यायालयातील सुनावणींचे थेट लाईव्ह प्रसारण करण्यात आले. सरन्यायाधीश म्हणून १६ महिन्यांच्या कालावधीत त्यांची कारकीर्द चांगली गाजली. शेवटच्या दिवसापर्यंत ते न्यायालयीन प्रक्रियेत राहिले. सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा हे शेवटच्या दिवसापर्यंत काम करीत राहिले आणि अनेक महत्त्वाच्या याचिकांवर सुनावणी घेतली. अखेरच्या दोन दिवसांत काल कर्नाटक कोळसा खाण, कर्नाटकातील बेल्लारी, चित्रदुर्ग आणि तुमाकुरू जिल्ह्यांतील खाण कंपन्यांसाठी लोह खनिज उत्खनन मर्यादेत वाढ केली. तसेच निवडणुकीतील मोफत आश्वासनांचे प्रकरण ३ न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे वर्ग केले.

गोरखपूर दंगल प्रकरण-२००७ च्या हेट स्पीच प्रकरणात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर खटला चालवण्यास मंजुरी देण्यात आली. या मंजुरीला आव्हान देणारी याचिका फेटाळण्यात आली. याशिवाय दिवाळखोरी कायदा-सीमा शुल्क अधिनियमसंबंधात दिवाळखोरी कायद्याबाबत सूचना केल्या. त्यानुसार सीमाशुल्क प्राधिकरण केवळ शुल्क आणि आकारणीचे प्रमाण ठरवू शकते. परंतु वसुलीची कार्यवाही सुरू करू शकत नाही, असे म्हटले. पेगासस समितीने सांगितले
की, त्यांना २९ पैकी ५ फोनमध्ये मालवेअर आढळले. परंतु ते पेगासस होते, हे स्पष्टपणे सांगता येणार नाही. सरकारने त्यांना मदत केली नाही, असे म्हटले. आता यावर पुढील सुनावणी सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात होणार आहे.
बिल्किस बानो : गुजरात सरकारच्या निर्णयाविरोधात सीपीआय (एम) नेत्या सुभासिनी अली, पत्रकार रेवती लाल आणि प्रोफेसर रूप रेखा वर्मा यांच्या याचिकेवर सुनावणी झाली. न्यायालयाने गुजरात सरकारला नोटीस बजावून ११ दोषींनाही या प्रकरणात पक्षकार बनण्यास सांगितले आहे. यासंदर्भात पुढील सुनावणी २ आठवड्यांनी होणार आहे.

पीएमएलए : प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँड्रिंग अ‍ॅक्ट (पीएमएलए) वरील पुनर्विलोकन याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला नोटीस दिली आहे. हा कायदा अत्यंत महत्त्वाचा असून, आम्ही केवळ २ बाबींवर पुनर्विचार करणार असल्याचे सांगितले. पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेत त्रुटी : पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेतील त्रुटी प्रकरणाच्या चौकशीसाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीने सर्वोच्च न्यायालयात सांगितले की, फिरोजपूरमधील एसएसपी हे कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात अपयशी ठरले. दोन दिवसांत अशा महत्त्वपूर्ण याचिकांवर सुनावणी घेतली. शेवटच्या क्षणापर्यंत कार्यरत राहिल्याने त्यांचे कौतुक होत आहे.

सुनावणीचे प्रथमच लाईव्ह स्ट्रीमिंग
सरन्यायाधीश रमणा निवृत्त होत असताना सुनावणीदरम्यान पहिल्यांदाच लाईव्ह स्ट्रीमिंग झाले. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या इतिहासातील हा ऐतिहासिक क्षण ठरला. फ्रीबी प्रकरणावरील सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आज थेट प्रक्षेपित झाला. एकूण २० केसेसचे लाईव्ह स्ट्रीमिंग करण्यात आले.

तुम्ही लोकांचे न्यायाधीश ज्येष्ठ विधिज्ञाला अश्रू अनावर
दरम्यान, अ‍ॅटर्नी जनरल के. के. वेणुगोपाल यांनी रमणा यांच्या निवृत्तीबद्दल बोलताना तुमच्या निवृत्तीमुळे आम्ही एक विचारवंत आणि उत्कृष्ट न्यायाधीश गमावत आहोत. त्याचवेळी ज्येष्ठ वकील दुष्यंत दवे यांना तर कोर्टातच रडू कोसळले. सरन्यायाधीश रमणांना ते म्हणाले की, तुम्ही लोकांचे न्यायाधीश आहात. त्यावेळी रमणादेखील भावूक झाले.

फक्त ५० दिवस काम करू शकलो
सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश एन.व्ही. रमणा यांच्या कार्यकाळाचा आजचा शेवटचा दिवस होता. यानिमित्त शुक्रवारी एन. व्ही. रमणा यांनी कार्यपीठाला संबोधित केले. १६ महिन्यांत मी केवळ ५० दिवस प्रभावी आणि पूर्णवेळ सुनावणी करू शकलो, असे म्हटले.

 

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या