नवी दिल्ली : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संसदेत पंतप्रधान कार्यालयात भेट घेतली. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात स्फोट झाला. संजय राऊतांवर ईडीची कारवाई होऊन २४ तासही उलटत नाहीत, तोच पवार मोदींच्या भेटीला पोहोचले. त्यामुळे त्यांच्या टायमिंगची संपूर्ण देशभरात चर्चा झाली. अखेर स्वत: शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन भेटीचा संपूर्ण तपशील जाहीर केला. मोदींना लक्षद्वीपच्या प्रश्नांवर भेटण्यासाठी गेलो होतो. सोबत विधान परिषद सदस्य नियुक्ती तसेच संजय राऊतांवरील कारवाईबाबतही बोलणे झाल्याचे पवारांनी सांगितले.
पवारांनी मोदींची भेट घेतल्याने राष्ट्रवादी पुन्हा भाजपशी जवळीक साधते आहे का, या प्रश्नावर उत्तर देताना पवार म्हणाले की, महाविकास आघाडीचे सरकार उत्तम काम करत आहे. उद्धव ठाकरे ५ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करतील. तसेच महाविकास आघाडी पुन्हा सत्तेत येईल, असा विश्वास व्यक्त केला. पवार यांनी आज दुपारी साडेबारा वाजता पंतप्रधान मोदींची भेट घेतली. या भेटीचे कारण गुलदस्त्यात होते. या भेटीत खा. संजय राऊत यांच्यावर झालेली ईडीची कारवाई आणि राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या नियुक्तीचाही मुद्दा मांडल्याचे पवार यांनी सांगितले. संपूर्ण देशभरात या भेटीची चर्चा झाली. प्रामुख्याने महाराष्ट्रातल्या राजकीय वर्तुळात तर भेटीनंतर भूकंप झाला. मात्र, त्यानंतर काही वेळातच पत्रकार परिषद घेऊन भेटीचा तपशील जाहीर करू, असे पवारांनी म्हटले. त्यानंतर तर सस्पेन्स आणखी ताणला गेला. अखेर पवारांनी भेटीचा एक एक तपशील माध्यमांसमोर मांडला.
लक्षद्वीपच्या मुद्यावर चर्चा
लक्षव्दीपच्या प्रश्नांसंबंधी पंतप्रधान मोदींची भेट घेतली. यावेळी लक्षव्दीपचे राष्ट्रवादीचे खासदार मोहम्मद फैजलदेखील उपस्थित होते. लक्षव्दीपमधील नागरिकांच्या मूलभूत सोयीसुविधांसाठी पाठपुरावा आणि त्याच दृष्टीने आजची भेट घेतली. लक्षद्वीपचे प्रशासक प्रफुल्ल के पटेल यांनी खूप सारे चुकीचे निर्णय घेतले. ज्यानंतर ७५ हजार लोकांवर बेरोजगारीचे संकट आले. मोदींच्या कानावर हे विषय टाकल्याचे पवारांनी सांगितले.
भाजपेतर पक्षांना एकत्रित आणणार
शरद पवार यांची संयुक्त पुरोगामी आघाडीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादीसह शिवसेनेच्या काही नेत्यांनी केली. याबाबत बोलताना पवार म्हणाले की, यूपीएचे अध्यक्षपद आम्हाला देण्यात यावे, अशी माझी किंवा आमच्या पक्षाची भूमिका नाही. ही जबाबदारी घेण्याची माझी तयारी नाही. मात्र, भाजपेतर पक्षांना एकत्र आणण्यासाठी जे प्रयत्न करावे लागतील, ते मी करणार आहे, असे म्हटले.