तेल अवीव : गेल्या वर्षी संसदेच्या अधिवेशनादरम्यान पेगासस हेरगिरी प्रकरण उजेडात आल्यानंतर भारतातील अनेकांना धक्का बसला होता. आता पुन्हा एकदा पेगासस हेरगिरी प्रकरणाबद्दल इस्रायली मीडियाने मोठा गौप्यस्फोट केल्याने खळबळ उडाली आहे.
काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी वाड्रा यांनाही पेगाससद्वारे लक्ष्य करण्यात आल्याचा दावा इस्रायली वृत्तपत्राने केला आहे. या यादीत निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर, पत्रकार सुशांत सिंग, परंजॉय गुहा ठाकुर्ता, मंगलम केशवन वेणू, जगदीप सिंग रंधवा, रोना विल्सन, सय्यद अब्दुल रहमान गिलानी, सुशांत सिंग, एस.एन.एम. अब्दी, बेला भाटिया, अंकित ग्रेवाल यांच्यासह अनेकांच्या नावांचा समावेश आहे. गेल्या वर्षी काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांनीही आपला फोन टॅप झाल्याचा दावा केला होता. हा केवळ माझ्या गोपनीयतेचा विषय नाही तर मी जनतेचा आवाज उंचावतो आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हे अस्त्र आपल्या देशाविरुद्ध वापरले असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले होते.
इस्रायली स्पायवेअरचा वापर
इस्रायली कंपनी एनएसओ ग्रुपच्या पेगासस स्पायवेअरचा वापर जगभरातील अनेक देशांमध्ये सरकार विरोधात काम करणा-या व्यक्तींची हेरगिरी करण्यासाठी केला जात असल्याची धक्कादायक बाब गेल्या वर्षी समोर आली होती. भारतातही बराच वाद झाल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाकडून या प्रकरणाच्या चौकशीसाठी एक समिती नेमण्यात आली.
आणखीन एक नवीन यादी जाहीर
पेगासस हेरगिरी प्रकरणातील नवी यादी अॅमनेस्टी इंटरनॅशनल आणि युनिव्हर्सिटी ऑफ टोरंटोच्या सिटीझन लॅब यांसारख्या डिजिटल फॉरेन्सिक गटांकडून जारी करण्यात आली आहे. या अगोदर गेल्या वर्षी अॅमनेस्टीच्या सिक्युरिटी लॅबने जगभरातील अनेक माध्यम समूहांच्या सहकार्याने पेगाससद्वारे पाळत ठेवण्यात आलेल्या अनेक प्रसिद्ध व्यक्तींच्या नावांची एक यादी प्रसिद्ध केली होती.