शिवपुरी : शिवपुरी जिल्ह्यातील बदरवासमधील निवासी भागात असलेल्या फटाक्यांच्या कारखान्यात मंगळवारी जोरदार स्फोट झाला. या अपघातात सुमारे २५ जण जखमी झाल्याची माहिती आहे. जखमींपैकी ४ जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येते, तर या दुर्घटनेत २ जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली.
सध्या एकामागून एक जखमींना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. जखमींना शिवपुरी आणि गुना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून जखमींपैकी बहुतांश एकाच कुटुंबातील असल्याचे सांगण्यात येते. अपघाताची माहिती मिळताच आमदार, जिल्हाधिकारी, एसपी घटनास्थळी पोहोचले आहेत.