22.1 C
Latur
Friday, January 28, 2022
Homeराष्ट्रीयभाजपशी लढण्यासाठी मजबूत आघाडीची गरज

भाजपशी लढण्यासाठी मजबूत आघाडीची गरज

एकमत ऑनलाईन

मुंबई : भाजपाचा अश्वमेध रोखणा-या व केंद्रात सक्षम आघाडी उभारण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मुंबईत त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसवर निशाणा साधताना यूपीए आहेच कुठे? असा सवाल केला. भाजपाशी लढण्याची तयारी असलेल्या पक्षांना सोबत घेऊन सक्षम आघाडी उभारण्याची गरज असून, कोणी लढायला तयारच नसेल तर काय करणार, असा टोलाही त्यांनी लगावला. त्यामुळे कॉंग्रेस नेत्यांनी नाराजी व्यक्त केली.

तीन दिवसांच्या मुंबई भेटीवर आलेल्या ममता बॅनर्जी यांनी शिवसेनेच्या नेत्यांची भेट घेतली होती. आज त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची त्यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानी भेट घेऊन प्रदीर्घ चर्चा केली. यानंतर शरद पवार आणि ममता बॅनर्जी यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. मुंबई दौ-यात आपल्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही भेटायचे होते. मात्र, त्यांना भेटता आले नाही. आज शरद पवार यांची भेट घेतली. देशात फॅसिझमचे वातावरण असून या फॅसिझमच्या विरोधात एक मजबूत आघाडी बांधण्याची गरज आहे. त्यासाठी सर्वांनी एकत्र येणे आवश्यक असल्याचे ममता बॅनर्जी यांनी सांगितले.

संयुक्त पुरोगामी आघाडीचे नेतृत्व यापुढे कोणकडे असणार या प्रश्नावर यूपीए आहे कुठे, असा प्रतिप्रश्न करताना ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसबद्दल नाराजी व्यक्त केली. यूपीए आता शिल्लक राहिलेली नाही. फॅसिस्ट शक्तीच्या विरोधात लढण्यासाठी समविचारी पक्षांनी एकत्र येण्याची व सक्षम पर्याय देण्याची गरज आहे. भाजप विरोधात जे लढतील त्या सर्वांना एकत्र घेण्याचा प्रयत्न असून जे लढायला तयार नाहीत, त्यांचे काय करणार, असा टोलाही ममता बॅनर्जी यांनी लगावला.

काँग्रेसही सोबत असेल : पवार
शरद पवार यांनी काँग्रेसला वगळून आघाडी निर्माण होण्याची शक्यता फेटाळून लावली. नव्या आघाडीत काँग्रेस असेल का? या प्रश्नावर काँग्रेस नसेल असे आम्ही म्हणालो नाही, असे उत्तर पवार यांनी दिले. भाजपाला सक्षम पर्याय द्यायचा असून कुणालाही वगळण्याचा प्रश्नच नाही. नेतृत्व हा मुद्दा गौण आहे. आज सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. केंद्रात निर्माण झालेल्या परिस्थितीविरोधात जे कोणी लढायला तयार आहेत, अशा सर्वांना एकत्र घेतले जाईल, असे पवार म्हणाले. पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्र या दोन राज्यांचे नाते जुने आहे. ते आणखी सकस होण्यासाठी ममता बॅनर्जी मुंबईत आल्या आहेत. आज मी आणि माझ्या सहका-यांची त्यांनी भेट घेतली. राष्ट्रीय स्तरावर जी परिस्थिती आहे, ती पाहता सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे. देशात एक नवा मजबूत पर्याय उभा करणे अत्यंत आवश्यक आहे, याबाबत सकारात्मक चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले.

भाजपला अप्रत्यक्षपणे मदत करणारे पर्याय कसा देणार?
मुंबई : भाजप आणि केंद्र सरकारच्या दडपशाहीविरोधात काँग्रेसच लढत आहे. आपल्या राजकीय फायद्यासाठी व वैयक्तिक महत्वाकांक्षेसाठी सोयीप्रमाणे भूमिका घेऊन कोणत्याही पक्षाला भाजपविरोधात लढता येणार नाही. काँग्रेसवर टीका करून भाजपाला अप्रत्यक्षपणे मदत करणारे कसा ठरू शकतील, असा जळजळीत सवाल करत ममता बॅनर्जी यांच्या टीकेला महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी प्रत्त्युत्तर दिले.

 

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या