नवी दिल्ली : आरजेडी सुप्रीमो लालू प्रसाद यादव यांच्यासमोरील अडचणींचा डोंगर कमी होताना दिसून येत नाही. एकीकडे ते आजारपणामुळे हैराण झाले आहेत, तर दुसरीकडे केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) भ्रष्टाचारप्रकरणी त्यांच्याविरुद्ध पुन्हा चौकशी सुरू केली आहे. रेल्वे प्रकल्पातील भ्रष्टाचाराचे हे प्रकरण आहे. सीबीआयने पुन्हा चौकशी सुरू केल्यानंतर त्यांची मुलगी रोहिणी आचार्य यांनी संताप व्यक्त केल्या. मंगळवारी त्यांनी ट्विटद्वारे भाजपवर हल्लाबोल केला.
रोहिणी आचार्य यांनी ट्विट करून लिहिले की, देशाच्या तपास यंत्रणा या भाजपच्या राजकीय योजनेचा भाग बनली आहे. माफी मागणा-यांची मुले लालूजींचा आत्मविश्वास तोडू शकणार नाहीत. कारण जनता आणि जनार्दन यांचे आशीर्वाद लालूजींसोबत आहेत. तुम्ही कितीही षड्यंत्र रचले तरी लालूजींच्या लोकप्रियतेला कधीच अंत होणार नाही. इतिहास त्यांचा कार्यकाळ लक्षात ठेवेल, ज्यांनी भारतीय रेल्वेला हजारो कोटींचा नफा दिला.