लातूर : प्रतिनिधी
विविध परिसंवादांसह सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी संचलित महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय आयोजित ०५ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दि. २२ ते २४ एप्रिलदरम्यान होणार आहे. या साहित्य संमेलनात विविध विषयांवरील परिसंवादांसह सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. काही नाविण्यपूर्ण उपक्रमही हाती घेण्यात आल्याची माहिती साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष राज्यमंत्री संजय बनसोडे व संमेलनाचे कार्याध्यक्ष बस्वराज पाटील नागराळकर यांनी रविवारी येथे पत्रकार परिषदेत दिली.
९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन संयोजन समितीच्या वतीने रविवारी येथील शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेस खासदार सुधाकर शृंगारे, महापौर विक्रांत गोजमगुंडे, आमदार अभिमन्यु पवार, आमदार संभाजी पाटील निलंगेकर, आमदार विक्रम काळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. साहित्य संमेलनाची माहिती देताना बस्वराज पाटील नागराळकर यांनी सांगीतले की, संमेलनाचे उद्घाटन दि. २२ एप्रिल रोजी सकाळी १०.३० वाजता राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे. अध्यक्षस्थानी संमेलनाध्यक्ष भारत सासणे हे राहणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून मावळते अध्यक्ष डॉ. जयंत नारळीकर, लेखक दामोदर मावजो, माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकुरकर, राज्याचे वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक कार्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, श्री सुभाष देसाई, पडित -हदयनाथ मंगेशकर यांची उपस्थिती राहणार आहे.
साहित्य संमेलनात विविध विषयांवर परिसंवाद, लोककला, कवीकट्टा, गझलमंच, निमंत्रितांचे कवी संमेलन, प्र्रकट मुलाखत, ग्रंथ प्रकाशकांचा सत्कार, संवाद कादंबरीकारांशी, सांस्कृतिक कार्यक्रम आदी कार्यक्रम होणार आहेत. ग्रंथदिंडीने साहित्य संमेलनास सुरुवात होणार आहे. त्यानंतर ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहेत.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद येणार
९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या समारोप कार्यक्रमास दि. २४ एपिल रोजी दुपारी १२ वाजता देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपस्थित राहणार आहेत. त्यांच्यासोबत महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत, असे संमेलनाचे स्वागताध्यक्ष राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी सांगीतले.
…………………………………………….