कोलकाता : पश्चिम बंगालच्या दक्षिण दिनाजपूरमध्ये एका शाळेतील शिक्षिका मुलीवर रागविल्याने मुलीच्या नातेवाईकांनी शिक्षिकेला निर्वस्त्र करून बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलीच्या नातेवाईकांनी व समाजबांधवांनी संतप्त होत शाळेत घुसून शिक्षिकेला मारहाण केल्याचे प्रकरण आता समोर आल्याने समाजातून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
मारहाणीमुळे शाळेत मोठा गोंधळ उडाला होता. घटनास्थळावर पोलिस दाखल झाले. त्यांनी परिस्थिती हाताळून ४ जणांना अटक केली असून ३५ जणांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. मारहाण करणारे लोक हे अल्पसंख्याक समाजातील असल्याचे सांगितले जात आहे. ही घटना हिली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील त्रिमोहिनी प्रतापचंद्र शाळेतील आहे. सदर विद्यार्थिनी ही इयत्ता नववीत शिक्षण घेत आहे.
तीन दिवसांपूर्वी शाळेत शिक्षिकेने मुलीला कोणत्या तरी कारणावरून राग करून शिवीगाळ केल्याची माहिती समोर आली. दुस-या दिवशी मुलीचे कुटुंबीय त्यांच्या काही मित्रांसह शाळेत दाखल झाले. शाळेतील शिक्षकांसह सदर शिक्षिकेवर गैरवर्तन केले. विरोध झाल्यावर शिक्षिकेला निवस्त्र करून बेदम मारहाण केली. तेव्हा शाळेत मोठा गोंधळ उडाला. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल दाखल झाले. त्यांनी परिस्थिती हाताळली.
मला प्रचंड भीती वाटते
महिला शिक्षिकेसोबत झालेल्या गैरवर्तणुकीमुळे स्थानिकांमध्ये संताप दिसून येत होता. लोकांनी रास्ता रोको करून निषेध केला. दोषींवर कारवाईची मागणी केली. याप्रकरणी पीडित महिला शिक्षिकेने विद्यार्थिनीला शिस्तीत ठेवण्यासाठी तिचे कान ओढून तिच्यावर रागविल्याचे सांगितले, असा प्रसंग माझ्यासोबत यापूर्वी कधीच घडला नव्हता. या प्रकरणामुळे मला प्रचंड भीती निर्माण झाली आहे, असे मतही पिडीत शिक्षिकेने सांगीतले.