खा. विनायकर राऊत यांनी दिली माहिती
नवी दिल्ली : लोकसभेतील शिवसेनेच्या गटनेतेपदाच्या नियुक्तीबाबत लोकसभा सचिवालयाने शिवसेनेवर अन्याय केला, असा आरोप शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी केला. तसेच शिंदे गटाने गटनेतेपदावर दावा करण्याआधीच लोकसभा सचिवालयाकडून खा. राहुल शेवाळेंच्या नियुक्तीचे पत्र काढण्यात आले होते, असा गंभीर आरोपही केला. या विरोधात त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेणार असल्याचे म्हटले आहे.
राज्यात शिवसेना आमदारांनी वेगळा गट केल्यानंतर शिवसेनेतर्फे ६ जुलै रोजी लोकसभा सचिवालयाला पत्र देण्यात आले. त्यात संसदेतील पक्षाच्या गटनेतेपदाबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी आमची बाजू ऐकण्याची विनंती करण्यात आली होती. त्यानंतर शिवसेनेचे १२ खासदार शिंदे गटासोबत गेल्यानंतर १८ जुलै रोजी रात्री साडेआठ वाजता पुन्हा लोकसभा सचिवालयाला पत्र दिले. १९ जुलै रोजी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना प्रत्यक्ष भेटूनही निवदेन दिले. मात्र, लोकसभा अध्यक्ष व लोकसभा सचिवालयाने आमच्या पत्राची साधी दखलही घेतली नाही. मात्र, शिंदे गटाला वेगळा न्याय दिल्याचा आरोप राऊत यांनी केला.
सुप्रीम कोर्टात जाणार
लोकसभा सचिवालयाच्या अशा कामकाजाबाबत आपण सुप्रीम कोर्टाकडे दाद मागणार आहोत. तसेच लोकसभा अध्यक्षांकडेही तक्रार करणार आहोत, असे विनायक राऊत यांनी सांगितले. तसेच संसदेतील गटनेता निवडण्याचे पूर्ण अधिकार पक्षप्रमुखांना असतात. असे असताना त्यांना विचारात न घेता लोकसभाध्यक्षांनी घाईघाईत निर्णय घेतला. पक्षाचा गटनेता अजूनही मीच असून आम्हाला सुप्रीम कोर्टात न्याय मिळेल, असे राऊत म्हणाले.