नवी दिल्ली : वृत्तसंस्था
१ एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्ष २०२३-२४ सुरू झाले आहे. हे नवीन आर्थिक वर्ष आपल्यासोबत अनेक नवीन बदल घेऊन आले आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी आजपासून व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात कपात केली आहे. दुसरीकडे सोनार आजपासून फक्त ६ अंकी हॉलमार्क असलेले सोन्याचे दागिने विकू शकतील. याशिवाय पेनकिलर, अँटिबायोटिक्स आणि हृदयाशी संबंधित औषधेही आजपासून महाग झाली आहेत. आज नव्या आर्थिक वर्षात जवळपास १३ बदल स्वीकारले गेले आहेत.
१९ किलोचा व्यावसायिक गॅस सिलिंडर ९२ रुपयांनी स्वस्त झाला आहे. मात्र, १४.२ किलोच्या घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. दिल्लीत व्यावसायिक गॅस सिलिंडर २११९.५० रुपयांऐवजी २०२८ रुपयांना उपलब्ध आहे, तर कोलकात्यात २१३२ रुपयांना मिळेल. पूर्वी ते २२२१.५० मध्ये उपलब्ध होते. मुंबईत त्याचा भाव १९८० रुपयांवर गेला आहे. पूर्वी तो २०७१.५० रुपये होता. चेन्नईत सिलिंडर २२६८ रुपयांऐवजी २१९२.५० रुपयांना मिळणार आहे. यासोबतच सरकारने ज्येष्ठ नागरिक बचत योजना आणि टाइम डिपॉझिटसह लहान बचत योजनांवरील व्याजदरात वाढ केली आहे. व्याजदरातील ही वाढ १ एप्रिलपासून लागू झाली आहे. राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र, मासिक उत्पन्न योजना आणि किसान विकास पत्रावरील व्याजदरातही वाढ झाली आहे.
दरम्यान, नवीन नियमानुसार १ एप्रिलपासून सहा अंकी अल्फान्यूमेरिक हॉलमार्किंगशिवाय सोन्याची विक्री होणार नाही. ज्याप्रमाणे आधार कार्डमध्ये १२ अंकी कोड असतो, त्याचप्रमाणे सोन्याला ६ अंकी हॉलमार्क कोड असतो. याला हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन नंबर म्हणतात. आता तो अनिवार्य केला आहे. देशभरात सोन्यावर ट्रेड मार्क देण्यासाठी ९४० केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. आता चार अंकी हॉलमार्किंग पूर्णपणे बंद होणार आहे. आयकरदात्यांना आजपासून नवीन कर प्रणाली मिळणार आहे. नवीन कर प्रणालीची निवड करणा-यांसाठी सवलत मर्यादा ७ लाख रुपये करण्यात आली आहे. पूर्वी ते ५ लाख रुपये होते. नवीन कर प्रणालीमध्ये ५० हजार रुपयांची मानक वजावटदेखील समाविष्ट करण्यात आली आहे. भविष्य निर्वाह निधीमधून पैसे काढण्याबाबत कर नियमांमध्ये बदल करण्यात आला आहे. १ एप्रिलपासून पीएफ खात्याशी पॅन लिंक नसल्यास तुम्ही पैसे काढले तर टीडीएस ३० टक्क्यांऐवजी २० टक्के असणार आहे.