नवी दिल्ली : स्पाईसजेटवर मोठी कारवाई करत नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने ८ आठवड्यांसाठी ५० टक्के फ्लाइट्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. विमानातील बिघाड होण्याच्या वाढत्या घटनांनंतर ही कारवाई करण्यात आली आहे.
विविध स्पॉट चेक, तपासणी आणि स्पाइसजेटने सादर केलेल्या कारणे दाखवा नोटीसला दिलेले उत्तर लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी डीजीसीएने स्पाइसजेटला वाढत्या तांत्रिक बिघाडांच्या घटना लक्षात घेता कारणे दाखवा नोटीस दिली होती.
एअरलाइन्सच्या विमानांमध्ये वारंवार होणा-या तांत्रिक त्रुटी लक्षात घेऊन ही नोटीस पाठवण्यात आली होती. गेल्या १८ दिवसांत स्पाइसजेटच्या विमानांमध्ये ८ वेळा तांत्रिक बिघाड आढळून आला होता. त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागले होते. तसेच सुरक्षेचा प्रश्नदेखील ऐरणीवर आला होता.