नवी दिल्ली : हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लिमिटेडने विकसित केलेल्या स्वदेशी लढाऊ जेट विमान तेजसने जागतिक पातळीवर सर्वांच्याच नजरेत भरणारी कामगिरी केली आहे. मात्र शत्रुच्या विमानांवर व लक्ष्यावर नजर ठेवण्यासाठी लागणारे रडार तंत्रज्ञानासाठी इस्रायलवरच अवलंबून राहावे लागत होते. मात्र आता डीआरडीओने उत्तम नावाचे रडार विकसित केले असून त्याच्या यशस्वी चाचण्यांनंतर त्याला तेजस विमानात बसविण्यस एचएएलने अनुकूलता दर्शविली आहे. परिणामी स्वदेशी तेजसमधील स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर ७० टक्क्यांपर्यंत वाढणार आहे. तसेच त्याची परदेशातून मागणीही वाढण्याची शक्यता वाढली आहे.
भारतीय बनावटीच्या तेजस विमानांच्या १२३ युनिटचा समावेश पुढील काही वर्षात भारतीय हवाई दलात समावेश करण्यात येणार आहे. हवाई दलात सामील केलेल्या पहिल्या दोन स्क्वाड्रनमधील तेजस विमानात इस्रायली बनावटीचे इएल/एम २०५२ हे एईएसए रडार बसविलेले आहे. त्याचा तेजसच्या मारक क्षमतेवर परिणाम होत होता. युरोपिअन कंपनीने विकसित केलेल्या मिटीऑर या क्षेपणास्त्राचा वापर तेजसमध्ये करण्यास त्याचा अडथळा होत होता. दुसरीकडे रडारसारख्या महत्त्वाच्या घटकासाठी परदेशावर अवलंबून राहणे हे संकटकाळात अचानक करावयाच्या उत्पादनवाढीसाठी बाधक ठरणार होते.
त्यासाठी स्वदेशी रडारयंत्रणा विकसित करण्याची मागणी हवाई संरक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात होती. त्यासाठी डीआरडीओनेही स्वदेशी रडारयंत्रणा विकसित करण्यासाठी प्रयत्न सुरु केले होते. मात्र हवाईदलाकडून त्यात अधिक सुधारणा सुचविण्यात येत होत्या. अखेर कठोर परिश्रमानंतर डीआरडीओने उत्तम हे स्वदेशी रडार विकसित केले असून ते हवाईदलाच्या चाचण्यांमध्ये उत्तीर्ण झाले आहे.
पुढील काळात हवाईदलात समावेश होणा-या १२३ तेजस फायटर विमानांमधील ५१ टक्के विमानात स्वदेशी बनावटीची उत्तम रडार यंत्रणा असेल. तर सुरुवातीच्या ४० विमानांमध्ये इस्रायली रडार असणार आहे. हवाईदळाने एचएएलला ८३ तेजस मार्क-१ए साठी फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात ऑर्डर दिली आहे.त्यातील पहिल्या २० विमानात इस्रायली बनावटीचे रडार असेल तर पुढील ६३ विमानात उत्तम रडार असेल.उत्तम रडारच्या कामगिरीबाबत डीआरडीओचे अध्यक्ष सतीश रेड्डी यांनी माहिती दिली. तेजस मार्क-१ ए मध्ये उत्तम रडार यंत्रणा असेल. आतापर्यंतच्या चाचण्यांमध्ये उत्तमने अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी केली आहे. एचएएलबरोबर आम्ही सामंजस्य करार केला आहे,असे रेड्डी यांनी सांगितले.
उत्तम रडारचे फायदे
– डीआरडीओच्या बंगळुरुमधील एलआरडीए प्रयोगशाळेने हे रडार विकसित केले आहे. त्यामुळे तेजसमधील स्वदेशी घटकांचे प्रमाण सुमारे ७० टक्क्यांपर्यंत वाढणार आहे. त्यामुळे या विमानांच्या उत्पादनाचा वेग वाढवता येणार आहे. त्यासाठी परदेशी खरेदीतील अनिश्चितता संपुष्टात येणार आहे.
– इस्त्रायलशी अनेक मुस्लिम राष्ट्रांचे राजनैतिक संबंध खराब आहेत. दुसरीकडे तेजस विमानांच्या आतापर्यंतच्या कामगिरीवर अनेक इस्लामी देशांकडून त्याच्या खरेदीची इच्छा व्यक्त होत होती. मात्र इस्त्रायली रडार यंत्रणा त्यांना त्यासाठी खटकत होती. मात्र आता उत्तम रडारमुळे या देशांची तेजसमधील शंका नष्ट होऊन त्याची मागणी वाढण्याची शक्यता आहे.
– उत्तम रडारमध्ये एकाचवेळी वेगवेगळया लक्ष्यांना शोधण्याची तसेच उच्चप्रतीचे फोटो काढण्याची क्षमता आहे. त्यामुळे तेजस विमानाला शत्रुच्या चौक्यांवर किंवा विमानांवर हल्ला करताना स्वत:चा बचाव करीत लक्ष्यभेद करण्यासाठी सुलभता आणखी वाढणार आहे.
– उत्तम रडारमधील सुधारित आवृत्तीत एकाचवेळी ट्रॅक स्कॅनिंग व टार्गेट स्कॅनिंगची क्षमता आहे. हवाईमार्गात एकाचवेळी आपल्या प्रवासाची सुरक्षितता व अचानक आलेल्या लक्ष्याला शोधता येणार आहे. त्यामुळे आक्रमणाचा वेग वाढवत लक्ष्यभेदही तेवढ्यााच वेगाने करता येणार आहे. ही क्षमता केवळ हवेतीलच नव्हे तर जमिनीवरीलही लक्ष्य शोधून नष्ट करण्यासाठी उपयोगी पडणार आहे.
तामिळनाडूत भाजपकडून हिंदुत्वाचे कार्ड