बेंगळुरू : भारतात वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळ्या त-हेने विवाह सोहळे पार पडतात आणि प्रत्येक विवाह सोहळा विशिष्ट प्रथेला धरुन पार पाडला जातो. पण कधी तुम्ही ३० वर्षापूर्वीच निधन झालेल्या वधूवराच्या सोहळ्याला गेले आहात का? मृत्यू पावलेल्या वधू वराच्या विवाहाला कोण जाणार? मृत्यू झालेले वधू-वर तरी राहणार का? हो पण हे खरे आहे.
३० वर्षापूर्वीच निधन झालेल्या एका जोडप्याचा विवाह सोहळा धुमधडाक्यात पार पडला. याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. ही घटना आहे कर्नाटकातील.
दक्षिण कर्नाटकमधील या प्रथेनुसार ज्या नवजात बालकांचा जन्मादरम्यान मृत्यू होतो त्या बालकाचे दुस-या नवजात मृत बालकाशी लग्न लावल्या जाते. मृत नवजाताच्या मृत्यूच्या २५ ते ३० वर्षानंतर म्हणजे ते तारुण्यवस्थेत आल्यानंतर त्यांचा विवाह सोहळा पार पाडण्यात येतो.
विशेष म्हणजे या सोहळ्यास वधु-वर उपस्थित नसले तरी त्यांच्याकडील लोक उपस्थित असतात आणि अगदी वधू-वर हयात असल्यासारखा विवाह सोहळा पार पडतो. यात एक विशेष अट आहे, ती म्हणजे या विवाह सोहळ्यात लहान मुलांना प्रवेश नसतो.
भारत हा जुन्या रुढी परंपरेने भरलेला देश आहे. तरी २१ व्या शतकात २ मृतकांचे लग्न ही बाब जरा धक्कादायक आणि चिंताजनक वाटत असली तरी हा परंपरेचा एक भाग आहे. त्यामुळे आजही ही प्रथा जपली जाते.